प्रतिनिधी /काणकोण
लोलये पंचायत क्षेत्रातील नेतुर्ली या ठिकाणी पाळीव कुत्र्यावर झडप घालायला आलेल्या एका बिबटय़ाने सरळ दिलीप सतरकर या व्यक्तीवर हल्ला करण्याची घटना 24 रोजी रात्री घडली. सुदैवाने ते बचावले असून सतरकर हे सध्या काणकोणच्या सामाजिक आरोग्य केंद्रात उपचार घेत आहेत.
सतरकर हे काणकोणच्या वीज कार्यालयाचे कर्मचारी असून बिबटय़ाने पाठलाग केल्यानंतर त्यांचा कुत्रा पळुन गेला. त्याचवेळी सतरकर यांच्यावर बिबटय़ाने हल्ला केला. स्थानिक नागरिक प्रसंगावधान राखून धावून आले नसते, तर या ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली असती. सतरकर यांच्या डोक्याला, पाठीला जखमा झाल्या आहेत. या ठिकाणी बिबटय़ांचा संचार सतत चालू असून त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी या ठिकाणी पिंजरा ठेवण्यात यावा. स्थानिक नागरिकांची त्यासाठी हवी ती मदत देण्याची तयारी आहे, अशी माहिती लोलयेचे माजी सरपंच अजय लोलयेकर यांनी दिली. उपचार घेत असलेल्या सतरकर यांची वन खात्याच्या अधिकाऱयांनी भेट घेऊन विचारपूस केली.