प्रतिनिधी/ मडगाव
राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी गोवा फॉरवर्डच्या निवेदनाची दखल घेऊन मडगावच्या लोहिया मैदानाला भेट देऊन त्याच्या सौंदर्यीकरणासाठी आवश्यक प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिल्याने गोवा फॉरवर्डने त्यांचे आभार मानले आहे. सरकार आता तरी हा विषय गांभीर्याने घेऊन सौंदर्यीकरण मार्गी लावेल, अशी आशा पक्षाचे सरचिटणीस मोहनदास लोलयेकर यांनी सोमवारी मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली. यावेळी मडगावच्या नगराध्यक्षा पूजा नाईक उपस्थित होत्या.
16 डिसेंबर, 2019 रोजी पक्षाचे अध्यक्ष असलेले फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी राज्यपाल मलिक यांना पत्र लिहून लोहिया मैदानाच्या सौंदर्यीकरणाकडे सरकारचे दुर्लक्ष झाल्याचे नजरेस आणून दिले होते, असे लोलयेकर यांनी सांगितले. आमदार असताना सरदेसाई यांनी सदर प्रकरणी विधानसभेत आवाज उठविला होता. सत्तेत आल्यावर मंत्री या नात्याने या सौंदर्यीकरणासाठी आवश्यक प्रक्रिया मार्गी लावून जी-सुडामार्फत निविदा काढण्यात आली होती. पण 2.07 कोटी रुपयांच्या सदर निविदेला आर्थिक मंजुरी देण्यास विलंब झाल्याने हे सौंदर्यीकरणाचे काम मार्गी लागलेले नाही, याकडे लोलयेकर यांनी लक्ष वेधले.
सरकार 2 कोटींचीही तरतूद करू शकत नाही ?
राम मनोहर लोहिया यांनी मुक्तीसंग्रामाची ज्योत पेटविली म्हणून गोवा पोर्तुगीजांच्या जोखडातून मुक्त झाला. असे असताना ज्या ठिकाणी ही ज्योत पेटविण्यात आली होती त्या लोहिया मैदानाचे सौंदर्यीकरण करण्यासाठी जेमतेम 2 कोटींची तरतूद सरकार करू शकत नाही काय, असा सवाल लोलयेकर यांनी उपस्थित केला. राज्यपाल मलिक यांनी सोमवारी सदर मैदानाला भेट दिली असता मैदानाच्या सौंदर्यीकरणाचे काम सरकारकडून आर्थिक मंजुरी न मिळाल्याने मार्गी लागलेले नसल्याचे आपण त्यांच्या नजरेस आणून दिल्याची माहिती नगराध्यक्षा नाईक यांनी दिली. राज्यपालांनी यासंदर्भात आवश्यक कृती करण्याचे आश्वासन यावेळी दिल्याने अर्थखाते सांभाळणारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आर्थिक मंजुरी देतील अशी आशा आम्ही बाळगतो, असे त्या म्हणाल्या.