दिव्यांग, तृतीयपंथी, वारांगणा यांच्यासाठी विशेष शिबिरे
प्रवीण देसाई/कोल्हापूर
वंचित घटकही लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात येऊन त्यांना मतदानाचा हक्क मिळावा, यासाठी निवडणूक आयोगाकडून उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दिव्यांग, तृतीयपंथी, वेश्या यांच्यासाठी मतदार नोंदणीकरीता स्वतंत्रपणे विशेष शिबिरे घेण्यात येणार आहेत. 1 ते 30 नोव्हेंबर या कालावधित आयोगाकडून विशेष मतदार नोंदणीचे कार्यक्रम होणार आहेत. या कालावधित वंचित घटकांसाठी शिबिरे घेऊन मतदार नोंदणी केली जाणार आहे. याबाबतचे निर्देश नुकतेच भारत निवडणूक आयोगाकडून जिल्हा निवडणूक विभागाला देण्यात आले आहेत.
नियमित मतदार नोंदणीर कार्यक्रमात या वंचित घटकांचीही नोंदणी होते. परंतु ती पूर्ण क्षमतेने होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शंभर टक्के वंचित घटकांची मतदार नोंदणी व्हावी, यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या मुंबईतील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून उपक्रम राबविले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर नुकतीच मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी व्हिडीओ कॉन्फरंसींग(व्हिसी)द्वारे बैठक घेतली. यामध्ये जिह्यातून उपजिल्हा निवडणूक अधिकार्यांसह तृतीयपंथी, दिव्यांग, वेश्या (शरीर विक्रीय करणार्या महिला) यांच्यासाठी काम करणार्या सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. यावेळी वंचितांच्या जास्तीत जास्त मतदार नोंदणीसाठी कार्यक्रम घ्यावेत असे निर्देश देण्यात आले.
त्यानुसार दिव्यांग, तृतीयपंथी, वेश्या यांच्यासाठी मतदार नोंदणीकरीता जिल्हा निवडणूक विभागाकडून 1 ते 30 नोव्हेंबर या कालावधित विशेष शिबिरे घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. विशेष मतदार नोंदणी शिबिरासोबतच मतदार जागृती कार्यक्रमही घेण्यात येणार आहेंत. यामध्ये दिव्यांग, तृतीयपंथील वेश्या यांच्यासाठी काम करणार्या सामाजिक संस्थांनाही सहभागी करुन घेतले जाणार आहे.
स्वत:च्या घोषणापत्रावर होणार मतदार नोंदणी
विशेष मतदार नोंदणी शिबिरांतर्गत ज्या वंचित घटकातील मतदारांकडे कागदोपत्री पुरावे आहेत ते पाहून नोंदणी केली जाणार आहे. तसेच ज्यांच्याकडे कागदोपत्री कोणतेच पुरावे नाहीत, त्यांच्यासाठी स्वयंम घोषणापत्राची सुविधा निवडणूक आयोगाने उपलब्ध केली आहे. त्यानुसार 18 ते 21 वयोगटातील मतदारांनी स्वयंम घोषणापत्र क्रमांक-1, तर 21 वर्षापुढील मतदारांनी स्वयंम घोषणापत्र क्रमांक-2 भरुन द्यायचे आहे.
निवडणूक आयोगाने विशेष मतदार नोंदणी कार्यक्रमांतर्गत दिव्यांग, तृतीयपंथी, वेश्या यां वंचित घटकांचीही शंभर टक्के नोंदणी होण्यासाठी विशेष शिबिरे घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसारक 1 ते 30 नोव्हेंबर या कालावधित ही शिबिरे घेण्याचे नियोजन सुरु आहे. -भगवान कांबळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी