प्रतिनिधी / बार्शी
बार्शी तालुक्यातील निवडणूक प्रक्रिया सुरू झालेल्या 96 ग्रामपंचायती मध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उभे राहणार असून पाच गावांमध्ये संपूर्ण पॅनल तयार झाले. असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष विवेक गजशिव यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष धनंजय जगदाळे, जिल्हा संघटक शोएब सय्यद, युवक आघाडीचे अध्यक्ष सुहास भालेराव, स्वप्निल भालशंकर, किशोर ढोले, महेश खुणे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पत्रकार परिषदेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक गजशिव यांनी बोलताना सांगितले की, निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार आता बार्शी तालुक्यातील जाहीर झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका मध्ये वंचित बहुजन आघाडी संपूर्ण ताकदीनिशी उभा राहणार आहे. आज पर्यंत 50 पेक्षा जास्त गावांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकार्यांचे दौरे झाले असून ग्रामीण भागामध्ये वंचित बहुजन आघाडीला वाढता पाठिंबा मिळत आहे. तर अनेक गावांमधून सुशिक्षित युवक उमेदवार म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर उभे राहण्यास तयार आहेत.
बार्शी तालुक्यातील आजपर्यंत वालवड, श्रीपत पिंपरी, खांडवी, बाबुळगाव,उपळाई ठोंगे या पाच गावांमध्ये स्वतंत्र पॅनल तयार केलेले आहेत. वंचित बहुजन आघाडी या ग्रामपंचायतीमध्ये नक्कीच यश मिळेल असा विश्वास या पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त करण्यात आला. तसेच ज्या गावांमध्ये बिनविरोध निवडणूक होण्याची प्रक्रिया चालू आहे त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना न्याय मिळावा अशी मागणी केली जर बिनविरोध च्या पॅनलमध्ये वंचित चा उमेदवार घेतला नाही तर त्या गावांमध्ये स्वतंत्र निवडणुक लढवण्यात येईल असा इशारा यावेळी बहुजन वंचित आघाडीच्यावतीने देण्यात आला.