हॉलिवूडमध्ये गूड न्यूज, गॅल गडोतने समाजमाध्यमांवर दिली माहिती
हॉलिवूडपट ‘वंडर वुमन’ची अभिनेत्री गॅल गडोत पुन्हा एकदा आई होणार आहे. यासंबंधीची माहिती गॅलने स्वतःच समाजमाध्यमांद्वारे दिली आहे. तसेच तिने कुटुंबाचे एक छायाचित्र प्रसारित केले असून यात तिचा पती जेरोन वर्सानो आणि दोन मुली अल्मा तसेच मायासह गॅल दिसून येत आहे.
गॅलने छायाचित्र प्रसारित करत ‘हियर वी गो अगेन’ असे म्हटले आहे. गॅलने ही गूड न्यूज गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळय़ातील स्वतःच्या हजेरीच्या काही तासांनी दिली आहे. या सोहळय़ाचे सूत्रसंचालन गॅलनेच केले हेते. गॅलच्या या घोषणेनंतर तिचे चाहते, मित्र-मैत्रिणी आणि जगभरातील सेलिब्रेटींनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता तसेच मौनी रॉय यांचाही यात समावेश आहे.
क्लियोपेट्रा, जस्टिस लीगमध्ये दिसणार
गॅल गडोत अलिकडेच ‘वंडर वुमन 1984’मध्ये दिसून आली होती. हा चित्रपट 25 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. गॅल लवकरच जॅक स्नायडर यांच्या ‘जस्टिस लीग’ चित्रपटात दिसून येईल. याचबरोबर वंडर वुमनच्या दिग्दर्शिका पॅटी जेंकिन्स यांच्या ‘क्लियोपेट्रो’मध्येही दिसून येणार आहे.