गोमंतकीयांना गोव्यात परतण्याची सुवर्णसंधी
प्रतिनिधी/ पणजी
वंदे भारत मिशन अंतर्गत अबुधाबी ते गोवा दरम्यानचे पहिले विमान येत्या दि. 10 डिसेंबर रोजी पहाटे गोव्यात पोहोचत आहे. या विमानातून 162 प्रवासी गोव्यात येतील. विमान फुल्ल झालेले असून पुढील विमाने येत्या दि. 17 आणि 20 डिसेंबर रोजी अबुधाबीहून निघतील.
दुबईस्थीत गोमंतकीय कन्या विशांती कवठणकर या गोमंतकीयांना सहकार्य करीत असतात. त्यांनी सांगितले की, भारत सरकारच्या वंदे भारत मिशन अंतर्गत अबुधाबीमध्ये असलेल्या गोमंतकीयांना गोव्यात येण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली. गेले 7 महिने विशांती कवठणकर यांनी अनेकांना गोव्यात परतण्यासाठी सहकार्य केलेले आहे. दि. 10 डिसेंबर रोजी मध्यरात्री 11.45 वा. अबुधाबीहून गोव्यात येण्यासाठी विमान निघेल. ते पहाटे मुंबईला येईल व दि. 11 रोजी पहाटे 5 वा. दाबोळी विमानतळावर पोहोचेल.
वंदे भारत मिशन अंतर्गत पुढील दोन विमाने दि. 17 डिसेंबर व 20 डिसेंबर रोजी निघणार आहेत. एअर इंडियांच्या या विमानाच्या बुकिंगकरिता वा अन्य कोणतीही माहिती हवी असल्यास एअर इंडियाच्या 0097126322300 या क्रमांकावर किंवा विशांती कवठणकर 0971-0527077375 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.