म्हापसा/ प्रतिनिधी :
बुधवारी संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास चिवार-हणजूण येथील वखारीत लाकूड खरेदी करण्यासाठी आलेल्यांनी वखारचालकावर खुनी हल्ला केल्याने वखारचालकासह तिघे जखमी झाले असून वखारचालकाची प्रकृती चिंताजनक आहे. हणजूण पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरापासून गुरुवारी पहाटेपर्यंत आठजणांना गजाआड करण्यात यश मिळविले असून एका अल्पवयीन मुलाची रवानगी मेरशी येथील ‘अपना घर’ या बाल सुधारगृहात करण्यात आली आहे. भादंसंच्या खुनी हल्ला कलमाखाली या प्रकरणाची नोंद करण्यात आली असून या खुनी हल्ल्यामुळे हणजूण परिसरात वातावरण तणावग्रस्त बनले आहे.
चिवार-हणजूण येथील वखारचालक दयालाल पटेल (54), त्यांचे सहकारी मुनीलाल पटेल (54), भरत पटेल (27) सर्वजण मूळ गुजरातचे असून सध्या राहणारे पर्रा-बार्देश, तसेच त्यांचे अन्य दोन कामगार यांच्यावर स्थानिक युवकांनी हा प्राणघातक खुनी हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले.
आठजणांना अटक, अल्पवयीन ‘अपना घर’मध्ये
या घटनेशी संबंधित नऊ संशयितांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले असून संशयित आंतोनियो डिसोझा (54), एलन डिसोझा (25), आसगाव, फेबीयर गोहार (कांदोळी), सुरेश पुजारी (कांदोळी), ज्योवीन रॉड्लीनो रॉड्रिगीश, (कार्मोणा-सासष्टी), अझर शेख (मुंबई), इम्रान खान (कळंगुट), तसेच श्रीमती शेवॉर्ट डिसोझा यांचा समावेश असून एका अल्पवयीना अपना घरमध्ये पाठविण्यात आले आहे. आठही संशयितांना नायालयाने 7 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
लाकूड खरेदीसाठी आलेले होते डिसोझा
कायसुव येथील व्यवसायिक वाटु वासु गोवेकर यांच्या मालकीची चिवार-हणजूण येथील ‘सरस्वती सॉ मील’ ही वखार गेली अनेक वर्षे पटेल हे भाडेपट्टीवर चालवत आहेत. बुधवारी दुपारी साडेतीनच्या दरम्यान, मुणांगवाडा-आसगांव येथील आंतोनियो डिसोझा व कुटुंबीय आपल्या नवीन रेस्टॉरंट्च्या बांधकामासाठी लागणारे लाकडी साहित्य खरेदी करण्यासाठी पटेल चालवीत असलेल्या या वखारीकडे आले होते.
अपशब्द वापरल्याने प्रकरण चिघळले
लाकडी साहित्याची जमवाजमव केल्यानंतर लाकडाच्या किंमतीवरून मुनीलाल पटेल तसेच डिसोझा यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. डिसोझा कुटुंबियांकडून पटेल यांना अपशब्द वापरण्यात आल्याने प्रकरण तापले. यावेळी पटेल यांनी आपल्या मजुरांच्या सहाय्याने डिसोझा कुटुंबियांवर हल्ला चढविला. त्यांच्या कारगाडीची नासधूस करुन त्यांना पिटाळून लावले, असा आरोप आंतोनियो डिसोझा कुटुंबियांकडून करण्यात आला आहे.
खुनी हल्ला करुन घेतला बदला
या घटनेचा बदला घेण्याच्या दृष्टीने डिसोझा कुटुबियांनी आपल्या मित्रांच्या आधाराने दुपारी साडेचार वाजता पटेल व वखारीतील अन्य कर्मचाऱयांवर खुनी हल्ला करीत त्यांना यथेच्छ बदडून काढले. यावेळी पटेल यांच्या डोक्मयावर दंडुक्मयांनी जबरी प्रहार करण्यात आल्याने ते रक्तबंबाळ अवस्थेत खाली पडले. त्यानंतर डिसोझा कुटुंबियांनी घटनास्थळावरून पळ काढल्याचे पोलिसांनी सांगितले.
वखारचालकाची प्रकृती चिंताजनक
वखारीचे मूळ मालक वाटु वासु गोवेकर यांच्याकडून या खुनी हल्ल्याची रितसर तक्रार हणजूण पोलिसात दाखल करण्यात आली आहे. तक्रारीची दखल घेऊन हणजूणचे पोलीस निरीक्षक सुरज गावस तसेच उपनिरीक्षक पार्सेकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी पटेल यांना त्यांच्या नातेवाईकांच्या सहाय्याने उपचारासाठी म्हापशातील खाजगी इस्पितळात दाखल केले. सध्या पटेल यांची तब्येत चिंताजनक असून त्यांच्यावर इस्पितळाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अखिल गोवा वखार संघटनेकडून समाधान
अखिल गोवा वखार संघटनेच्या पदाधिकाऱयांनी हणजूण पोलिसस्थानकाचे उपनिरीक्षक कोरगावकर यांची भेट घेऊन बुधवारी झालेल्या हल्ल्यासंबंधात सविस्तर चर्चा केली. हणजुण पोलिसांनी तात्काळ कारवाई करुन आठ संशयितांना आपल्या ताब्यात घेतल्याबद्दल अखिल गोवा वखार संघटनेकडून समाधान व्यक्त करण्यात आले. याप्रसंगी हणजुणचे पोलीस निरीक्षक सुरज गांवस हे महत्त्वाच्या बैठकीसाठी पणजीत असल्याने त्यांची भेट होऊ शकली नसल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱयानीं यावेळी सांगितले.