सरकारी कर्मचाऱयांमध्ये उडाली खळबळ
प्रतिनिधी / बेळगाव
वजन माप खात्याचे सहाय्यक नियंत्रक सुभाष उप्पार यांच्या घरावर एसीबीने धाड घातली आहे. त्यांच्या घरासह त्यांनी घेतलेल्या भाडोत्री घर व कार्यालयावर तसेच त्यांच्या नातेवाईकांच्या घरावरही धाड घालून त्या ठिकाणी कागदपत्रांची तपासणी करण्यात आली आहे. मंगळवारी पहाटेच ही धाड घालण्यात आले.
एसीबीच्या एका पथकाने एसीबीचे अधिकारी नॅमगौडर यांच्या नेतृत्वाखाली ही धाड घालण्यात आली. अचानक पडलेल्या या धाडीमुळे मोठी खळबळ उडाली आहे. वजन माप खात्याच्या अधिकाऱयावर धाड पडल्याने याची जोरदार चर्चा सुरू आहे. हे कार्यालय कधी अधिक लोकांच्या चर्चेत येत नाही. मात्र ही धाड पडल्यानंतर वजन माप खात्याकडे किती अधिकार आहेत त्या अधिकाराचा काय उपयोग केला जातो, याबाबत अनेक जण चर्चा करताना दिसत होते.
गेल्या वर्षभरापासून अशा प्रकारे धाडी पडण्याचे थांबले होते. मात्र आता अचानक सरकारी अधिकाऱयांच्या घरावर धाड पडल्यामुळे एकच खळबळ माजली असून जे भ्रष्टाचारी अधिकारी आहेत, अनेकांनी जी माया जमविली आहे त्यांच्यामध्ये मात्र भितीचे वातावरण पसरले आहे.