डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा : अतिरेकपणा बेततोय जीवावर
अलिकडच्या काळात डाएट, जीम, स्मुदी, वेगवेगळे ज्युस यांचा वापर करून वजन कमी करण्याचे फंडे वाढत आहेत. मात्र त्याबाबतीत तज्ञांचा, आहार शास्त्रज्ञांचा सल्ला न घेता स्वयंम घोषित डॉक्टर होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कधीकधी जीव धोक्मयात येवू शकतो. त्यामुळे पूर्ण माहिती शिवाय आणि डॉक्टरी सल्ल्याशिवाय स्वतःवर उपचार न करणे सोयस्कर ठरेल.
दुधी भोपळय़ाचा रस पिऊन अलिकडेच एका प्रतिष्ठित व्यक्तीला निष्कारण प्राणाला मुकावे लागले आहे. दुधी भोपळा नेमका कसा सेवन करावा? याचे अज्ञान असल्याने ही घटना घडली आहे.
दुधी भोपळय़ामध्ये आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त अनेक घटक आहेत. यामध्ये कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, झिंक, मॅग्नेशियम, मॅगनीज, पोटॅशियम, फायबर असे घटक आहेत. याच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहून रक्तवाहिन्यातील नको असलेले कोलेस्ट्रॉल साठवून निर्माण झालेले अडथळे दूर होण्यास मदत मिळते. तो लो कॅलरी असल्याने वजनही नियंत्रित राहते. शिवाय इन्शुलीनचे प्रमाण वाढवून ग्लुकोजही कमी होते.
पितशामक व कफ नाशक आहे. शांत झोप येण्यासाठी, मानसिक आरोग्यासाठी अशक्तपणा दूर करण्यासाठी, ताण-तणावामुळे आलेली डोकेदुखी दूर करण्यासाठी दुधी भोपळा उपयुक्त ठरतो. फायबर असल्याने बद्धको÷ता व मूळव्याधीसाठी तो उपयुक्त ठरतो. मात्र हाच दुधी भोपळा काळजी न घेता सेवन केल्यास प्राणघातक ठरतो.
दुधी भोपळा जर चवीस कडू असेल तर त्याचे सेवन प्राणघातक ठरते. कडू भोपळय़ामध्ये अनेक विषारी घटक असतात. नैसर्गिकरित्या स्वसंरक्षणास व प्राण्यांपासून वाचण्यासाठी काही वनस्पतींमध्ये हे विषारी घटक उपजतच असतात. अशा दुधी भोपळय़ाचा रस सेवन केल्यास मृत्यू येवू शकतो.
कडू दुधी भोपळय़ामुळे किडणी, फुफ्फुस, हृदय, मेंदू व रक्तपुरवठा यावर परिणाम होतो. उलटय़ा व जुलाब सुरू होतो. रक्तदाब अत्यंत कमी होवून व्यक्ती दगावू शकतो. त्यातील विषारी घटकांवर परिणामकारक असे विषनाशक द्रव्ये उपलब्ध नसल्याने फक्त लक्षणावरून उपचार केला जातो. मात्र कडू दुधी भोपळय़ाचे 50 ते 100 मि. ली. रस सेवन केल्यास ती व्यक्ती नक्की दगावते.
काकडी, दोडके, पडवळ, तोंडली कडू असल्यास फेकून देतो. तसेच दुधी भोपळय़ाच्या बाबतीत करायला हवे. मात्र ते होताना दिसत नाही. औषध जेवढे कडू तेवढे अधिक प्रभावी, या भोंगळ कल्पनेमुळे एखादी व्यक्ती प्राणास मुकू शकते.
यासाठी रस किंवा भाजीसाठी दुधी भोपळा घेताना तो कडू नाही याची खात्री करायला हवी. ताजा व कोवळाच दुधी भोपळा घ्यायला हवा. तो कच्चा खावू नये. जास्त जून असलेलापण खाऊ नये. दुधीच्या आतील बिया मोठय़ा पिकलेल्या किंवा खूप अधिक प्रमाणात असतील तर खराब आहे असे समजावे.
फळ, पालेभाज्या, घ्या मुखीः आरोग्य ठेवा सुखी हे जरी खरे असले तरी दुधी भोपळा खाऊन निरोगी राहण्याचे स्वप्न पाहताना तो जितका कडू तितका परिणामकारक असे मात्र कृपया समजू नये.
– डॉ. आर. जी. विवेकी
प्राध्यापक व विभाग प्रमुख कम्युनिटी हेल्थ बिम्स, बेळगाव