शिगडय़ा व अन्य बनावट साहित्य जप्त
प्रतिनिधी / फोंडा
वजन व माप खात्याच्या पथकाने वरचा बाजार फोंडा येथील शेगडय़ा व त्यांचे सुटे भाग विकणाऱया दोन दुकानांवर धाड टाकून साधारण दीड लाख रुपये किंमतीचे सामान जप्त केले. वजन माप खात्याचे निरीक्षक शुब्रत जॉन डिकॉस्ता यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली.
फोंडा येथील हे व्यापारी उत्पादनाची तारीख, त्यांचे पॅकिंग व एमआरपी नसलेल्या शेगडय़ा, त्यांचे सुटे भाग व किचनमधील वापरातील अन्य साहित्य विकत असल्याची माहिती वजन माप खात्याला मिळाली होती. या माहितीची खातरजमा करुन अचानकपणे ही धाड टाकण्यात आली. या कारवाईत एका दुकानदाराकडून साधारण रु. 1 लाखांचे बनावट साहित्य तर दुसऱया दुकानदाराकडून रु. 50 हजारांच्या किंमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. वजनमाप खात्याचे अधिकारी नितीन पुरुषन, दामू मापारी, जयेश नाईक व वाहनचालक नितेश नावेलकर यांचा या कारवाईत समावेश होता.