प्रतिनिधी / बेळगाव
वटपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ विविध साहित्यांनी सजली आहे. त्यामुळे पूजेच्या साहित्यांनी बाजारपेठ बहरलेली पाहायला मिळली. गुरुवारी वटपौर्णिमा असल्याने बाजारपेठेत महिलांनी वटपौर्णिमेच्या पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी महिलांच्या बरोबरीने पुरुषांनीदेखील आपल्या पत्नीला पूजेचे साहित्य बाजारातून आणून दिल्याचे निदर्शनास आले.
यावेळी पतीराजांच्या दीर्घायुष्यासाठी आधुनिक सावित्रींची लगबग बाजारपेठेत पाहायला मिळाली. दरवषी सायंकाळच्या निवांत वेळेत महिला वटपौर्णिमेच्या साहित्याची खरेदी करण्यासाठी गर्दी करतात. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा 5 वाजता बंद होत असल्याने सकाळच्या सत्रात महिलांची गर्दी दिसून आली. यावेळी आधुनिक पेहराव करून नोकरदार महिलांनीही वटपौर्णिमा साजरी करण्यासाठी साहित्य खरेदीकरिता गर्दी केली होती.
यामध्ये सौभाग्य वाचन- आरसा, फणी, हळदी कुंकूचे करंडे, मणी मंगळसूत्र व वडाला गुंडाळण्याचा धागा आहे. यंदा दोन दिवस आधीपासूनच या साहित्याची विक्री झाली. न जाणो पुन्हा लॉकडाऊन झाले तर… असा विचार करून महिलांनी आधीच वटपौर्णिमेच्या पूजेसाठी लागणारे साहित्य खरेदी केले. यावेळी वडाच्या फांद्यादेखील विक्रीसाठी बाजारात उपलब्ध होत्या. तसेच छोटे आंबे 60 ते 120 रुपये दराने विक्री केले जात होते. वाण, सूत, पूजेसाठी लागणारी 5 प्रकारची छोटी फळे प्रत्येकी 20 रुपये दराने विक्री करण्यात येत होती. काही महिला गणपत गल्ली, नरगुंदकर भावे चौक, शहापूर, वडगाव, अनगोळ यासह उपनगरी भागातहे सर्व साहित्य विक्री करत होत्या.