बेळगाव / प्रतिनिधी
वडगावची ग्रामदेवी श्री मंगाईदेवी मंदिर आवारात मंगळवारी श्री रेणुका देवीच्या (सौंदत्ती) प्रतिकृतीचा दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला होता. सौंदत्ती यल्लम्मा येथे शाकंभरी पौर्णिमेनिमित्त गेलेल्या वडगाव येथील भाविकांचे मंगाईदेवी मंदिर आवारात आगमन झाले होते. या यात्रेकरू, भाविक आणि ग्रामस्थांसाठी हा दर्शन सोहळा आयोजित केला होता. या सोहळय़ास यात्रेकरू व भाविकांची गर्दी झाली होती. श्री रेणुका देवीची सुंदर प्रतिकृती आणि फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.
शाकंभरी पौर्णिमेनिमित्त दरवर्षी वडगाव येथून सौंदत्ती येथील श्री रेणुका देवीच्या दर्शनासाठी असंख्य भाविक जात असतात. सदर भाविक परतल्यानंतर मंगाई मंदिर आवारात त्यांचे वास्तव्य असते. मंगाई मंदिर आवारात यात्रेकरूंची मंगळवारी जत्रा भरलेली होती. भाविकांच्यावतीने सामूहिक पडली भरण्याचा कार्यक्रम करण्यात आला. यानिमित्त चव्हाण-पाटील परिवार आणि ग्रामस्थांच्यावतीने रेणुका देवी प्रतिकृती दर्शन सोहळय़ाचे आयोजन केले होते. या उपक्रमाचे यात्रेकरू आणि भाविकांनी कौतुक केले.