प्रतिनिधी / बेळगाव
येळ्ळूर मेन रोड वडगाव येथील बस थांब्यानजीक डेनेज वाहिनी फुटल्याने सर्व सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांना ये-जा करताना नाक मुठीत धरुनच जावे लागत आहे. ही परिस्थिती गेल्या आठ ते नऊ दिवसांपासून तशीच
आहे.
येथील डेनेज वाहिनी फुटल्याने सर्व डेनेजचे सांडपाणी नागरिकांच्या घरासमोर साचले आहे. परिणामी नागरिकांना घरातून बाहेर पडणे मुश्कील झाले असून सांडपाण्यावर डासांचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. तसेच डेनेजचे पाणी विहिरीत जाऊन विहिरीतील पाणीदेखील खराब होत आहेत.
मुख्य रस्त्यावरच ही डेनेज वाहिनी फुटल्यामुळे येथील व्यावसायिक, दुकानदार यासह अन्य नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या फुटलेल्या डेनेजची दुरुस्ती लवकरात लवकर करावी. अशी मागणी परिसरातील नागरिकांतून केली जात आहे.