दोघा जणांवर एफआयआर, 10 हजार रुपये जप्त
प्रतिनिधी /बेळगाव
संभाजीनगर, वडगाव येथे सुरु असलेल्या एका मटका अड्डय़ावर छापा टाकण्यात आला आहे. शुक्रवारी शहापूर पोलिसांनी ही कारवाई केली असून एका मटकाबुकीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी बाळू तोपीनकट्टीसह दोघा जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
मार्केटचे एसीपी सदाशिव कट्टीमनी, शहापूरचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूरचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आर. आय. सनदी व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे. संभाजीनगर येथील शेवटच्या बस थांब्याजवळ छापा टाकून उमेश इराप्पा कुसाने (वय 52, रा. संभाजीनगर, वडगाव) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी उमेशची चौकशी केली असता त्याने बाळु तोपीनकट्टी (रा. हनुमाननगर) याला चिठ्ठय़ा पोहोचवत असल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे उमेश बरोबरच बाळू तोपीनकट्टी विरुध्दही कर्नाटक पोलीस कायदा 78 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी 10 हजार 40 रुपये जप्त केले आहेत. शहापूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.