4.4 एकर जागेत 130 कोटी खर्चून उभारणार अत्याधुनिक हॉस्पिटल : किदवाई कॅन्सर संस्थेचे संचालक डॉ. सी. रामचंद्रन यांची माहिती
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव जिह्यामध्ये कॅन्सरचे रुग्ण वाढत चालले आहेत. बेळगाव जिह्याबरोबरच उत्तर कर्नाटकातील जिह्यांना तसेच महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील कॅन्सर रुग्णांसाठी वडगाव येथे कॅन्सर हॉस्पिटलची उभारणी केली जाणार आहे. 4 एकर 4 गुंठे जमिनीमध्ये हे अत्याधुनिक हॉस्पिटल 130 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येणार आहे, अशी माहिती बेंगळूर किदवाई कॅन्सर संस्थेचे संचालक डॉ. सी. रामचंद्रन यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेला जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याचे अधिकारी शशिकांत मुन्याळ, सर्व्हेक्षण अधिकारी डॉ. बाळकृष्ण तुक्कार उपस्थित होते. यापूर्वी तुमकूर, शिमोगा आणि म्हैसूर येथे कॅन्सर हॉस्पिटल सुरू करण्यात आले आहे. त्याच पद्धतीने येथेही हे कॅन्सर हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे.
या हॉस्पिटलच्या उभारणीसाठी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार आता 100 बेडस्चे हे हॉस्पिटल होणार आहे. दोन वर्षांमध्ये याची उभारणी केली जाईल.
कॅन्सर संदर्भात सर्व उपचार होणार
या हॉस्पिटलमध्ये केमोथेरपी शस्त्रक्रिया, रेडिओ थेरपी तसेच इतर कॅन्सर संदर्भातील सर्व उपचार केले जाणार आहेत. संशोधन केंद्र देखील या हॉस्पिटलमध्ये सुरू करण्यात आले आहे. या हॉस्पिटलचा विस्तार वाढविण्याबाबत उभारणीनंतर पुन्हा विचार केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार
कॅन्सरचे प्रमाण वाढत चालल्यामुळे आता सरकारने कॅन्सरबाबत उपचार देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सध्या महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण वाढल्याचा उल्लेखही त्यांनी केला आहे. या ठिकाणी वैद्यकीय विद्यार्थी देखील संशोधनासाठी विविध जिह्यातून येणार आहेत. या हॉस्पिटलमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांनादेखील मार्गदर्शन केले जाणार असल्याचे डॉ. सी. रामचंद्रन यांनी सांगितले.