प्रतिनिधी / बेळगाव
वडगाव रस्त्याचे स्मार्ट सिटी योजनेंतर्गत काँक्रिटीकरण करण्यात आले. मात्र, येथील डेनेज चेंबरचे काम अर्धवट ठेवण्यात आले आहे. मुख्य रस्त्याशेजारीच डेनेज चेंबर खुले ठेवण्यात आले असल्याने वाहनधारकांना धोकादायक बनले आहे. सप्पार गल्ली कॉर्नरवरील उघडय़ा चेंबरमुळे दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. याबाबत आवश्यक उपाययोजना राबविण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे.
स्मार्ट सिटी योजनेतील कामे अर्धवट असल्याने याचा फटका स्थानिक रहिवाशांना बसत आहे. अर्धवट कामे पूर्ण करण्यासाठी सातत्याने तक्रार करूनही स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱयांनी झोपेचे सोंग घेतले आहे. याबाबत जिल्हाधिकाऱयांसह वरि÷ अधिकाऱयांनी मौन बाळगले असल्याने स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱयांचे फावले आहे. मात्र, याचा त्रास स्थानिक रहिवाशांसह वाहनधारकांना होत
आहे.
शहरात स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सुरू असलेली सर्वच कामे अर्धवट स्थितीत आहेत. काँक्रिटीकरणानंतर उर्वरित कामे पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष केले असल्याने डेनेज वाहिन्या, डेनेज चेंबर आणि गटारींचे बांधकाम अर्धवट आहे. बॅ. नाथ पै चौक ते येळ्ळूर रोड कॉर्नरपर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले. येथील डेनेज चेंबर उंच करण्याचे कामदेखील हाती घेण्यात आले होते. मात्र, सप्पार गल्ली कॉर्नर येथील डेनेज चेंबरचे बांधकाम पूर्ण झाले नसल्याने सदर चेंबर उघडय़ावर सोडण्यात आले आहे. चेंबरच्या सभोवती दगड व माती ठेवण्यात आली आहे. मात्र, या उघडय़ा चेंबरचा धोका वाहनधारक व रहिवाशांना होत आहे.
सदर डेनेज चेंबर मोठे असल्याने लहान मुलांनादेखील याचा धोका आहे. पण स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱयांनी याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. मुख्य रस्ता असल्याने रस्त्यावरून वाहनांची वर्दळ नेहमीच असते. त्यामुळे डेनेज चेंबरवर झाकण घालण्याची गरज आहे. या ठिकाणी कोणताही अनर्थ घडण्यापूर्वी डेनेज चेंबरचे काम पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.