केवळ 24 तासांत 2 किलोमीटर लांबीचा महामार्ग तयार
वृत्तसंस्था/ वडोदरा
गुजरातच्या वडोदरा शहराला मुंबई आणि दिल्लीशी थेट जोडणाऱया द्रुतगती मार्गाने चार जागतिक विक्रम स्वतःच्या नावावर केले आहेत. सद्यकाळात वडोदरापासून भरूचपर्यंत द्रुतगती मार्गाचे काम सुरू आहे. याचदरम्यान मंगळवारी म्हणजेच 2 फेब्रुवारी रोजी 2 किलोमीटर लांबीचा आणि 18.75 मीटर रुंदीचा महामार्ग केवळ 24 तासांतच तयार करण्यात आला आहे. या निर्मितीकार्यासाठी 1.10 लाख सिमेंटच्या पिशव्या (5.5 हजार टन) आणि 500 टन बर्फाचाही वापर करण्यात आला असून याकरता 3 कोटी रुपयांचा खर्च आला आहे.
या 4 जागतिक विक्रमांपैकी सर्वात पहिला 12 हजार टन सिमेंट काँक्रिटचे उत्पादन करण्याचा आहे. दुसरा विक्रम या काँक्रीटला अत्यंत जलदपणे आच्छादणे तर तिसरा विक्रम एक फूट जाडीचा आणि 18.75 मीटर रुंदीचा रस्ता तयार करण्याचा आहे. चौथा विक्रम रिजिड पेव्हमेंट गुणवत्ता राखण्याचा आहे. ही सर्व कामे केवळ 24 तासांतच पूर्ण करण्यात आली आहेत.
देशासाठी मैलाचा दगड
भारताच्या रस्तेनिर्मितीत ही आतापर्यंतची सर्वात मोठी कामगिरी आहे. आम्ही नोंदविलेला विक्रम नजीकच्या काळात तोडणे अवघड आहे. ही केवळ विक्रमाची बाब नसून आधुनिक भारताचे चित्र असल्याचे उद्गार पटेल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अरविंद पटेल यांनी काढले आहेत. रस्तेनिर्मितीत भारताची ही कामगिरी जगासाठी नेत्रदीपक ठरत आहे. जगभरात एकाचवेळी 16 मीटर रुंदीचा द्रुतगती मार्ग तयार करण्यासाठी काँक्रिट लेयर मशीनचा वापर करण्यात येतो. पण हा दुतगती मार्ग 18.75 मीटर रुंदीचा आहे. याचमुळे संबंधित कंपनीने जर्मनीतून 20 कोटी रुपयांच्या किमतीची तीन यंत्रे खरेदी केली होती. या यंत्रांच्या मदतीने हे काम जलदगतेने साकारण्यात येत आहे.
अशी घडली कमाल…
1250 लोकांचा रस्तेनिर्मितीत सहभाग
मालवाहतुकीसाठी 115 टिपर्स ट्रक
मॅकेनिकल विभागात 300 लोकांची टीम
250 लोकांकडे निर्मिती विभागाची जबाबदारी
1 लाख 50 हजार लिटर एचएसडीचा वापर
5 लाख किलोग्रॅम (500 टन) बर्फाचा वापर
1 लाख 30 हजार डोएल बार-टीचा वापर
5000 टन सिमेंटचा झाला वापर
1500 टन फ्लाय ऍश मिक्स करण्यात आले
80 हजार किलो मिक्सचा वापर केला