उत्तराखंडच्या पर्वतीय जिल्हय़ांना आगीने घेरले आहे. अनेक दिवस उलटूनही अद्याप अनेक भाग आगीने धगधगत आहेत. आगीची व्याप्ती वाढल्याने राज्य सरकारला ती विझविण्यासाठी केंद्र सरकारकडून मदत मागावी लागली आहे. वायुदलाच्या हेलिकॉप्टर्सच्या मदतीने गढवाल आणि कुमाऊच्या जंगलातील आग विझविण्याचे काम वेगाने सुरू आहे. या कामात आता स्थानिक महिलांचा एक समूह स्वतःच्या क्षममेतनुसार सहकार्य करत आहे.
गढवाल आणि कुमाऊ या दोन्ही भागांमधील शेकडो महिलांनी अनेक स्थानिक समूह स्थापन करत आग विझविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या समुहांची मदत वन विभागाला अत्यंत उपयुक्त ठरत आहे. चमोली, बागेश्वर, नैनिताल आणि चंपावत जिल्हय़ांमधील महिलांनी अनेक छोटे समूह तयार केले असून ते आग विझविण्यासाठी मदत करत आहेत. याचबरोबर या महिला स्थानिक लोकांना जंगलातील आग रोखणे आणि वेळीच आवश्यक पावले उचलण्याबाबत जागरुक करत आहेत. त्यांनी या कार्याला स्वतःची मोहीमच ठरविले आहे.