लांजा-वेरवली खुर्द बेर्डेवाडी धरणातील घटना
प्रतिनिधी / लांजा
तालुक्यातील वेरवली खुर्द कातळवाडीनजीक रस्त्याशेजारी एकत्रित ठेवलेल्या बेर्डेवाडी धरण प्रकल्पाच्या कालव्याचे 100 पाईप व अन्य साहित्य आगीत जळून खाक झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. येथील माळरानाला वनवा लागल्याने पॅनॉलचे पाईप व अन्य साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असावे, असा अंदाज व्यक्त होत आहे. मात्र या घटनेची तक्रार धरण प्रकल्पाचे मॅनेजर यांनी रविवारी उशिरा लांजा पोलीस स्थानकात दाखल केली. या घटनेत लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.
या घटनेची माहिती मिळताच लांजा व राजापूर पोलीस स्थानकाचे पोलीस कर्मचारी रविवारी घटनास्थळी दाखल झाले होते. वेरवली रामवाडी-वेरवली खुर्द-पडवण रस्त्याशेजारी वेरवली खुर्द कातळवाडी येथील माळरानावर बेर्डेवाडी धरणाच्या पॅनॉलचे एचडीपीई पाईप व अन्य साहित्य ठेवण्यात आले होते. वेरवली बुद्रुक बेर्डेवाडी धरणांमधून वेरवली खुर्दच्या दिशेने एचडीपीई पाईपच्या सहाय्याने पॅनॉल तयार करण्यात येत आहे. पॅनॉलचे मोठय़ा प्रमाणात काम सुरू असल्याने 100 च्या जवळपास पाईपचा एकत्रित साठा करून ठेवण्यात आला होता. पाईप व त्यासाठी अन्य साहित्य त्या ठिकाणी होते. दरम्यान शनिवारी सांयकाळी कातळवाडी येथील माळरानाला वणवा लागला. माळरानावर गवत जास्त असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. यावेळी माळरानावर असलेल्या पॅनॉलच्या एचडीपीई पाईपला आग लागली. त्यामुळे सर्व पाईपना आगीने वेढले. 100 च्या जवळ्पास असलेले मोठमोठे पाईप आगीत बेचिराख झाले.
एकीकडे या धरणाच्या पाईपलाईनचे काम प्रगतीपथावर सुरू असतानाच दुसरीकडे रचलेल्या पाईपला मोठी आग लागल्याने संबंधीत ठेकेदाराचे लाखोहून जास्त नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आगीचे रौद्ररूपामुळे परिसरात प्रचंड धुराचे लोट पसरले होते. धुराचे लोट पाहताच वेरवली बुद्रुक व खुर्दमधील नागरिकांनी धाव घेतली. पाण्याच्या टँकरने आगीवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले सर्व पाईप जळून खाक झाले. घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला आहे. आगीत पॅनॉलचे अन्य साहित्य जळाले आहे का, नेमकी किती पाईप जळाले व नेमकी आग कशामुळे लागली, या बाबत अधिक तपास लांजा पोलीस करत आहेत.