वृत्तसंस्था/ दुबई
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा यांनी आयसीसीने बुधवारी जाहीर केलेल्या ताज्या वनडे मानांकनात अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान कायम राखले आहे. गोलंदाजीत जसप्रिम बुमराह पाचव्या स्थानावर स्थिर आहे.
कोहली व रोहित शर्मा यांनी अनुक्रमे 857 व 825 गुण मिळविले असून पाकिस्तानच्या बाबर आझमने 865 गुणांसह आघाडीचे स्थान कायम राखले आहे. गोलंदाजांत बुमराह 690 गुणांसह पाचव्या स्थानावर असून न्यूझीलंडचा बोल्ट 737 गुणांसह पहिल्या, बांगलादेशचा मेहिदी हसन मेराज 725 गुणांसह दुसऱया, अफगाणचा मुजीब उर रहमान 708 गुणांसह तिसऱया व न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्री 691 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. लंकेविरुद्ध झालेल्या वर्ल्ड सुपरलीग मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात शानदार प्रदर्शन केल्याने बांगलादेशच्या मेहदी हसनला क्रमवारीत तीन स्थानांची बढती मिळाली आहे. टॉप दोनमध्ये स्थान मिळविणारा बांगलादेशचा तो केवळ तिसरा गोलंदाज आहे. यापूर्वी 2009 मध्ये अष्टपैलू शकीब अल हसनने पहिले स्थान मिळविले होते. त्यानंतर डावखुरा स्पिनर अब्दुर रझाकने दुसरे स्थान मिळविले होते.
बांगलादेशच्या मुस्तफिजुर रहमाननेही गोलंदाजांच्या क्रमवारीत आठ स्थानांची प्रगती करीत नवव्या स्थानावर मजल मारली आहे. फलंदाजांत मुस्तफिजुर रहीमने लंकेविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यात 84 व 125 धावांचे योगदान देत सामनावीराचा बहुमान मिळविला होता. क्रमवारीत त्याला चार स्थानांची बढती मिळाली असून तो आता 14 व्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचा सहकारी मेहमुदुल्लाहनेही दोन स्थानांची प्रगती करीत 38 वे स्थान मिळविले आहे. लंकेसाठी वेगवान गोलंदाज दुश्मंता चमीराने 11 स्थानांची प्रगती करीत पी.डिसिल्वासह संयुक्त 61 वे स्थान मिळवेले आहे. डीसिल्वानेही आठ स्थानांची प्रगती केली आहे.