महान जलद गोलंदाज मायकल होल्डिंगचे प्रतिपादन
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
वनडे क्रिकेटचा करिष्मा ओसरला असल्याची कितीही ओरड झाली तरी यात काहीही तथ्य नाही. वनडेचे महत्त्व जैसे थे आहे आणि भविष्यातही ते कायम राहील. वनडे क्रिकेटबाबत चिंतेचे काहीच कारण नाही, असे स्पष्ट प्रतिपादन विंडीजचे महान जलद गोलंदाज मायकल होल्डिंग यांनी केले. यापूर्वी, रिकी पाँटिंग व राहुल द्रविड या दिग्गज खेळाडूंनी टी-20 व कसोटी क्रिकेटच्या जलद प्रभावामुळे वनडे बाजूला सारल्याची भीती व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर होल्डिंग बोलत होते.
‘माझ्या मते, आयसीसी वनडे क्रिकेट प्रकाराला किंचीतही धक्का लावणार नाही. कारण, वनडे क्रिकेटमुळे टीव्ही प्रसारण हक्कातून त्यांची मोठी कमाई होते’, असे ते म्हणाले. ‘इन्स्टाग्राम लाईव्ह वुईथ निखिल नाझ’ या कार्यक्रमात त्यांनी संवाद साधला. क्रिकेटचे सामने सातत्याने छोटे-छोटे करत जाणे योग्य ठरणार नाही, असे मत त्यांनी येथे व्यक्त केले. स्वतः होल्डिंग हे टी-20 क्रिकेटचे फारसे भोक्ते मानले जात नाहीत.
‘20-20 षटकांच्या लढतीत लोकांचे भले मनोरंजन होत असेल. बऱयाच कालावधीपूर्वी 10-10 षटकांचे प्रायोगिक सामनेही झाले आहेत. यापुढे कदाचित लोक 20-20 षटकांच्या सामन्यांनाही कंटाळतील आणि कदाचित 5-5 षटकांच्या लढतीचीही मागणी होईल. छोटेखानी सामने लक्षवेधी ठरत असतीलही. पण, चाहत्यांचे याच पद्धतीने लक्ष वेधण्याची गरज मला वाटत नाही. छोटय़ा-छोटय़ा अशा पद्धतीच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित ठेवण्याची चूक केली तर कदाचित हाती काहीच शिल्लक राहणार नाही’, असे होल्डिंग स्पष्टीकरणार्थ म्हणाले.
चेंडूला लाळ लावण्यावर बंदी घातल्याने व्यावहारिकदृष्टय़ा कोणतीही अडचण येणार नाही, असा दावा त्यांनी येथे केला. लाळेच्या वापरावर बंदी घातल्यामुळे गोलंदाजांना याच्याशी जुळवून घेण्यास काही वेळ लागू शकतो, असे ते म्हणाले. जी झळाळी लाळ लावल्याने येते, तीच झळाळी घामाच्या वापरानेही येते आणि घामामुळे कोरोनाचा फैलाव होतो, असे ऐकिवात आलेले नाही, असे त्यांनी स्पष्ट पेले.
कुंबळेंच्या मताशी असहमत
आयसीसीच्या क्रिकेट समितीचे अध्यक्ष अनिल कुंबळे यांनी फलंदाज व गोलंदाजात जुगलबंदी रंगण्यासाठी क्रिकेटमध्ये खेळपट्टय़ा त्या पद्धतीने बनवणे योग्य ठरेल, अशी भूमिका घेतली होती. पण, होल्डिंग यांनी त्याच्याशी असहमती दर्शवली.
‘माझ्या मते खेळपट्टीशी कोणतीही हरकत करणे योग्य ठरणार नाही. बऱयाच ग्राऊंड्समनना तर नेमके काय हवे, ते करणेही शक्य होणार नाही. यामुळे काही बाबी बिघडू शकतात. या परिस्थितीत असा कोणताही धोका न स्वीकारता खेळाडूंनी चेंडूला लाळ न लावण्याची सवय करुन घेणे रास्त ठरेल, असे ते म्हणाले. सध्याच्या सर्व जलदगती गोलंदाजांमध्ये ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स अधिक सरस वाटतो आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये रोहित शर्मापेक्षा विराट कोहली अधिक प्रभावी वाटतो, याचा होल्डिंग यांनी शेवटी उल्लेख केला.
खेळात वर्णद्वेषाविरुद्ध नियम म्हणजे फक्त मलमपट्टी होईल
खेळाडूंना प्रत्यक्ष खेळताना वर्णद्वेषाला सामोरे जावे लागते, त्यावर उपाययोजना म्हणून काही नियम तयार केले तर पूर्ण समस्या निकालात काढण्याऐवजी ती केवळ मलमपट्टी केल्यासारखे होईल, असे होल्डिंग एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले. अमेरिकेत आफ्रिकन-अमेरिकन जॉर्ज फ्लॉईड यांना मारले गेल्यानंतर अनेक ऍथलिट्सनी त्याचा निषेध केला. त्या पार्श्वभूमीवर होल्डिंग यांनी खेळात केवळ सक्त नियम करणे पुरेसे ठरणार नाही, असे मत मांडले.
‘क्रिकेट मैदानावर, फुटबॉलच्या मैदानावर लोक काही ना काही बोलत राहतील, ओरडत राहतील. वर्णद्वेष उफाळून येण्यासाठी त्यांची वक्तव्ये पूरक ठरतील. त्यामुळे, हा वर्णभेद निकाली काढण्यासाठी खेळात कठोर नियम लादण्याऐवजी जनजागृती करणे अधिक योग्य ठरेल’, असे ते म्हणाले. होल्डिंगचे राष्ट्रीय सहकारी डॅरेन सॅमी व ख्रिस गेल यांनी देखील वर्णभेदाविरुद्ध यापूर्वी आवाज उठवला आहे. आयपीएल स्पर्धेत सनरायजर्सतर्फे खेळताना मला कालू असे संबोधले जायचे, असा गौप्यस्फोट यापूर्वी सॅमीने केला आहे.