वृत्तसंस्था/ दुबई
आयसीसीतर्फे बुधवारी घोषित करण्यात आलेल्या वनडे क्रिकेट फलंदाजांच्या ताज्या मानांकन यादीत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली तसेच उपकर्णधार रोहित शर्मा यांनी अनुक्रमे पहिले आणि दुसरे स्थान पटकाविले आहे. त्याचप्रमाणे आयसीसीच्या वनडे ताज्या गोलंदाजांच्या मानांकनात भारताचा जसप्रित बुमराह दुसऱया स्थानावर आहे.
आयसीसीच्या वनडे क्रिकेट फलंदाजांच्या ताज्या मानांकनात कर्णधार विराट कोहली 871 मानांकन गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. या यादीत उपकर्णधार रोहित शर्मा 855 मानांकन गुणांसह दुसऱया स्थानावर आणि पाकचा बाबर आझम 829 गुणांसह तिसऱया स्थानावर आहे. कोहली आणि शर्मा यांच्यात आता केवळ 16 गुणांचा फरक आहे. आयसीसीच्या गोलंदाजांच्या वनडे क्रिकेट ताज्या मानांकन यादीत भारताचा बुमराह 719 गुणांसह दुसऱया स्थानावर असून न्यूझीलंडचा बोल्ट पहिल्या स्थानावर आहे. फलंदाजांच्या मानांकन यादीत आयर्लंडचा कर्णधार बेलबिमे याने 42 वे स्थान मिळविले आहे. त्याच्या मानांकनात 4 अंकांनी सुधारणा झाली आहे. आयर्लंडचा स्टर्लिंग या यादीत 26 व्या स्थानावर आहे.
आयसीसीच्या वनडे गोलंदाजांच्या ताज्या मानांकन यादीत आयर्लंडचा वेगवान गोलंदाज क्रेग यंगने 89 वे स्थान मिळविले आहे. या यादीत आयर्लंडचा ऍडेर 138 व्या तर लिटल 146 व्या स्थानावर आहे. इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यातील वनडे मालिका इंग्लंडने 2-1 अशा फरकाने जिंकली आहे. इंग्लंडचा कर्णधार मॉर्गन फलंदाजांच्या मानांकन यादीत 22 व्या तर बेअरस्टो 13 व्या स्थानावर आहे. गोलंदाजांच्या यादीत इंग्लंडचा फिरकी गोलंदाज आदिल रशीदने 25 वे स्थान तर डेव्हिड विलीने 51 वे स्थान मिळविले आहे. आयर्लंड विरूद्धची मालिका जिंकल्याने इंग्लंडला 20 गुण मिळाले आहेत. 2023 साली भारतात होणाऱया आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत 13 संघांना थेट प्रवेश दिला जाईल. यजमान भारतासह अन्य सात संघांनी या स्पर्धेसाठी थेट प्रवेश केला आहे.