सामनावीर’ टॉम लॅथमचे नाबाद शतक, विल्यम्सनचे नाबाद अर्धशतक, धवन-श्रेयस-गिलची अर्धशतके वाया
वृत्तसंस्था/ ऑकलंड
कर्णधार केन विल्यम्सन आणि शतकवीर टॉम लॅथम यांच्या तुफानी फटकेबाजीसमोर भारतीय गोलंदाज पूर्णपणे निष्प्रभ ठरले. शुक्रवारी येथे झालेल्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान न्यूझीलंडने भारताचा 7 गडय़ांनी पराभव केला. कर्णधार विल्यम्सन आणि लथम यांनी चौथ्या गडय़ासाठी अभेद्य 221 धावांची विक्रमी भागीदारी केली. भारताचा कर्णधार शिखर धवन, गिल आणि श्रेयस अय्यर यांची अर्धशतके वाया गेली.
या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिली. भारताने 50 षटकात 7 बाद 306 धावा जमवित न्यूझीलंडला विजयासाठी 307 धावांचे आव्हान दिले. त्यानंतर न्यूझीलंडने 47.1 षटकात 3 बाद 309 धावा जमवित हा सामना 17 चेंडू बाकी ठेवून जिंकला. भारतातर्फे उमरान मलिकची गोलंदाजी इतर गोलंदाजांच्या तुलनेत प्रभावी झाली.
कर्णधार धवन आणि शुबमन गिल यांनी पहिल्या षटकापासूनच सावध फलंदाजी करत न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांसमोर संघाला चांगली सुरुवात करून दिली. या जोडीने 23.1 षटकात 124 धावांची भागीदारी झळकविली. धवन आणि गिल या सलामीच्या जोडीने पहिल्या 10 षटकात 40 धावा जमविल्या. त्यानंतर हेन्रीच्या गोलंदाजीवर फर्ग्युसनने गिलला जीवदान दिले. या जीवदानाचा लाभ घेत गिलने आपले अर्धशतक पूर्ण केले. 21 व्या षटकात भारताचे शतक फलकावर झळकले. धवनने हेन्रीच्या गोलंदाजीवर 15 व्या षटकात सलग दोन चौकार ठोकले. यानंतर गिलने मिल्नेच्या गोलंदाजीवर आणखी दोन चौकार नोंदविले. गिलने क्षेत्ररक्षकांच्या डोक्मयावरून फटके मारण्यावर अधिक भर दिला होता. त्याने लाँग ऑन आणि थर्ड मॅनच्या दिशेने दोन षटकारही मारले. गिल आणि कर्णधार धवन यांनी संघाचा धावफलक हलता ठेवला. गिलने सँटनरच्या एका चेंडूवर एक षटकार नोंदविला. त्यानंतर साऊदीच्या गोलंदाजीवर धवनने दोन चौकार मारले. गिलने आपले अर्धशतक 65 चेंडूत 3 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने झळकविले. फर्ग्युसनच्या गोलंदाजीवर गिलने चुकीचा फटका मारला आणि तो कॉनवेकरवी झेलबाद झाला. गिल बाद झाल्यानंतर धवन फार काळ मैदानावर राहू शकला नाही. साऊदीच्या गोलंदाजीवर कर्णधार धवनने पॉईंटच्या दिशेने मारलेला फटका ऍलेनने अचूकपणे टिपला. धवनने 77 चेंडूत 13 चौकारांसह 72 धावा जमविल्या. भारताची स्थिती यावेळी 24.3 षटकात 2 बाद 124 अशी होती.
यष्टीरक्षक आणि फलंदाज रिषभ पंत फर्ग्युसनच्या गोलंदाजीवर पूलचा फटका मारण्याच्या नादात त्रिफळाचीत झाला. त्याने 23 चेंडूत 2 चौकारांसह 15 धावा जमविल्या. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेला सूर्यकुमार यादव केवळ 3 चेंडू खेळू शकला. यादवने आपले खाते चौकाराने उघडले. पण त्यानंतर फर्ग्युसनच्या या षटकातील तिसऱया चेंडूवर तो स्लीपमधील ऍलेनकरवी झेलबाद झाला. त्याने 4 धावा जमविल्या. श्रेयस अय्यरने दमदार फलंदाजी करताना 76 चेंडूत 4 षटकार आणि 4 चौकारांसह 80 धावा झळकविल्या. अय्यर आणि संजू सॅमसन या जोडीने पाचव्या गडय़ासाठी 94 धावांची भर घातली. मिल्नेच्या गोलंदाजीवर सॅमसन फिलिप्सकरवी झेलबाद झाला. फिलिप्सने हा झेल डावीकडे झेपावत घेतला. सॅमसनने 38 चेंडूत 4 चौकारांसह 36 धावा जमविल्या. श्रेयस अय्यरने वॉशिंग्टन सुंदरला साथीला घेत संघाचे त्रिशतक 49.2 षटकात फलकावर लावले. वॉशिंग्टन सुंदरने 16 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 37 धावा झोडपल्या. डावातील शेवटचे षटक साऊदीने टाकले. या षटकातील दुसऱया चेंडूवर अय्यर कॉनवेकरवी झेलबाद झाला. साऊदीने आपल्या याच षटकातील शेवटच्या चेंडूवर शार्दुल ठाकुरला बाद केले. भारताच्या डावामध्ये 10 षटकार आणि 28 चौकार नोंदविले गेले. न्यूझीलंडतर्फे साऊदी आणि फर्ग्युसन यांनी प्रत्येकी 3 तर मिल्नेने 1 गडी बाद केला.
ऑकलंडच्या मैदानावर 300 पेक्षा अधिक धावांचा पाठलाग करत विजय मिळविण्याची ही न्यूझीलंडची पहिलीच खेप आहे. भारतीय गोलंदाजांनी पहिल्या 20 षटकांमध्ये न्यूझीलंडच्या फलंदाजांवर चांगलेच दडपण आणले होते. 20 व्या षटकाअखेर न्यूझीलंडची स्थिती 3 बाद 88 अशी होती. ऍलेन आणि कॉनवे यांनी सुरुवातीपासूनच फटकेबाजीला प्राधान्य दिले होते. 8 व्या षटकातील तिसऱयाच चेंडूवर शार्दुल ठाकुरने ऍलेनला यष्टीरक्षक पंतकरवी झेलबाद केले. त्याने 25 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 22 धावा जमविल्या. भारतीय संघात स्थान मिळविणारा जम्मू-काश्मीरचा नवोदित वेगवान गोलंदाज उमरान मलिकने 16 व्या षटकात भारताला दुसरे यश मिळवून दिले. त्याने कॉनवेला पंतकरवी झेलबाद केले. कॉनवेने 42 चेंडूत 3 चौकारांसह 24 धावा जमविल्या. उमरान मलिकने 20 व्या षटकात न्यूझीलंडला आणखी एक धक्का देताना मिचेलला बदली खेळाडू हुडाकडे झेल देण्यास भाग पाडले. मिचेलने 16 चेंडूत 1 षटकारासह 11 धावा जमविल्या.
भारतीय गोलंदाजांना 20 षटकापूर्वी बऱयापैकी यश मिळाले. पण त्यानंतर विल्यम्सन आणि लॅथम या जोडीने चौथ्या गडय़ासाठी अभेद्य 221 धावांची भागीदारी केली. विल्यम्सनच्या तुलनेत लॅथम अधिक आक्रमक वाटत होता. लॅथमने 104 चेंडूत 5 षटकार आणि 19 चौकारांच्या मदतीने नाबाद 145 तर विल्यम्सनने 98 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने नाबाद 94 धावा झळकविल्या. 39 व्या षटकाअखेर न्यूझीलंडला विजयासाठी 66 चेंडूत 91 धावांची जरुरी होती. मात्र, शार्दुल ठाकुरच्या षटकाने सामन्याला पूर्ण कलाटणी दिली. डावातील हे 40 वे षटक न्यूझीलंडला अधिकच फायदेशीर ठरले. लॅथमने ठाकुरच्या या षटकात 1 षटकार आणि 4 चौकारांसह 25 धावा झोडपल्या. लॅथमच्या या फटकेबाजीमुळे न्यूझीलंडचा विजय जवळपास निश्चित झाला. भारताच्या गोलंदाजांना न्यूझीलंडची ही जोडी शेवटपर्यंत फोडता आली नाही. न्यूझीलंडने हा सामना अखेर 7 गडय़ांनी आणि 17 चेंडू बाकी ठेवून जिंकला. न्यूझीलंडच्या डावात 8 षटकार आणि 31 चौकार नोंदविले गेले. भारतातर्फे उमरान मलिकने 66 धावात 2 तर शार्दुल ठाकुरने 63 धावात 1 गडी बाद केला. अर्शदीप सिंग, वॉशिंग्टन सुंदर, यजुवेंद्र चहल यांची गोलंदाजी पूर्ण निस्तेज ठरली.
संक्षिप्त धावफलक
भारत 50 षटकात 7 बाद 306 (धवन 72, गिल 50, अय्यर 80, पंत 15, सूर्यकुमार यादव 4, संजू सॅमसन 36, वॉशिंग्टन सुंदर नाबाद 37, ठाकुर 1, साऊदी 3-73, फर्ग्युसन 3-59, मिल्ने 1-67). न्यूझीलंड 47.1 षटकात 3 बाद 309 (लॅथम नाबाद 145, विल्यम्सन नाबाद 94, ऍलेन 22, कॉनवे 24, मिचेल 11, उमरान मलिक 2-66, ठाकुर 1-63).