हजाराव्या सामन्यात विंडीजवर 6 गडय़ांनी मात, रोहित शर्माचे अर्धशतक, यजुवेंद्र चहल ‘सामनावीर’,
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
येथील नव्याने बांधण्यात आलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरील पहिल्या वनडे सामन्यात यजमान भारताने विंडीजचा 6 गडय़ांनी पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत विजयी सलामी दिली. यजुवेंद्र चहलला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले. भारतीय संघाचा हा ऐतिहासिक 1000 वा वनडे सामना असल्याने त्याला विशेष महत्व प्राप्त झाले होते. भारतातर्फे युजवेंद्र चहलने चार तर वॉशिंग्टन सुंदरने तीन गडी बाद केले. विंडीजला 176 धावांवर रोखल्यानंतर भारताने 28 षटकांत 4 बाद 178 धावा जमविल्या.
कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. विंडीजच्या डावातील तिसऱया षटकांतच मोहम्मद सिराजने सलामीचा फलंदाज शाय होपचा त्रिफळा उडविला. पहिल्या 10 षटकाअखेर विंडीजची स्थिती 1 बाद 39 अशी होती. कर्णधार शर्माने आठव्या षटकांतच गोलंदाजीत बदल करून फिरकी गोलंदाज वॉशिंग्टन सुंदरकडे चेंडू सोपविला. त्याने विंडीजचा सलामीचा फलंदाज किंगला सुर्यकुमार यादवकरवी झेलबाद करून आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरविला. वॉशिंग्टन सुंदरने विंडीजला आणखी एक धक्का देताना डरेन ब्रॅव्होला 18 धावांवर पायचीत केले. विंडीजचे पहिले अर्धशतक 13 व्या षटकांत फलकावर लागले. भारतीय गोलंदाजांनी अचूक गोलंदाजी करत विंडीज संघावर दडपण आणले.
दरम्यान कर्णधार शर्माने पुन्हा गोलंदाजीत बदल करून यजुवेंद्र चहल दुसऱया बाजूने गोलंदाजीसाठी पाचारण केले. चहलच्या फिरकीसमोर विंडीजचे दोन फलंदाज पाठोपाठच्या चेंडूवर तंबूत परतले. चहलच्या या पहिल्या षटकांतील तिसऱया चेंडूवर निकोलास पुरन 18 धावांवर पायचीत झाला तर चौथ्या चेंडूवर कर्णधार पोलार्डचा खाते उघडण्यापूर्वीच त्रिफळा उडाला. विंडीजचा निम्मा संघ 71 धावांत तंबूत परतला होता. चहलने आपल्या दुसऱया षटकांमध्ये ब्रुक्सला (12) यष्टीरक्षक पंतकरवी झेलबाद केले. चहलने पुरनला बाद करून वनडेतील आपला 100 वा बळी नोंदविला. त्यानंतर चहलने पोलार्डला बाद करून आपला वनडेतील 101 वा बळी मिळविला.
वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने अकिल हुसेनला खाते उघडण्यापूर्वी पंतकरवी झेलबाद केले. विंडीजची स्थिती यावेळी 22.5 षटकांत 7 बाद 79 अशी केविलवाणी होती. त्यानंतर माजी कर्णधार जेसन होल्डर आणि ऍलेन यांनी विंडीजचा डाव सावरताना आठव्या गडय़ासाठी 78 धावांची भागिदारी केली. वॉशिंग्टन सुंदरने आपल्या दुसऱया हप्त्यातील गेलंदाजीत ऍलेनला स्वतःच टिपले. ऍलेनने 43 चेंडूत 2 चौकारांसह 29 धावा जमविल्या. प्रसिद्ध कृष्णाने जेसन होल्डरला यष्टीरक्षककडे झेल देण्यास भाग पाडले. होल्डरने 71 चेंडूत 4 षटकारांसह सर्वाधिक 57 धावा जमविल्या. प्रसिद्ध कृष्णाचा हा दुसरा बळी ठरला तर यष्टीरक्षक पंतचा हा तिसरा झेल ठरला. शेवटी चहलने जोसेफला यादवकडे झेल देण्यास भाग पाडले. जोसेफने 1 षटकार आणि 1 चौकारांसह 13 धावा जमविल्या. विंडीजचा डाव 43.5 षटकांत 176 धावांत आटोपला. चहलने 49 धावांत 4, वॉशिंग्टन सुंदरने 30 धावांत 3, प्रसिद्ध कृष्णाने 29 धावांत 2 तर मोहम्मद सिरीजने 26 धावांत 1 गडी बाद केला. विंडीजच्या डावात 5 षटकार आणि 13 चौकार नोंदविले गेले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना कर्णधार रोहित शर्मा आणि इशान किशन या सलामीच्या जोडीने 13.1 षटकांत 84 धावांची भागिदारी केली. डावातील 14 षटकांत विंडीजच्या जोसेफने कर्णधार शर्माला पायचीत केले. त्याने 51 चेंडूत 1 षटकार आणि 10 चौकारांसह 60 धावा जमविल्या. जोसेफने आपल्या या षटकांतील पाचव्या चेंडूवर माजी कर्णधार विराट कोहलीला रोशकरवी झेलबाद केले, कोहलीने 4 चेंडूत 2 चौकारांसह 8 धावा जमविल्या. इशान किशन (28) अकिल हुसेनच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला तर यष्टीरक्षक पंत चोरटी धाव घेण्याच्या नादात जोसेफच्या अचूक फेकीवर धावचीत झाला. त्यानंतर सुर्यकुमार यादव आणि नवोदित दीपक हुडा यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. भारताने 28 षटकांत 4 बाद 178 धावा जमवित हा सामना सहा गडय़ांनी जिंकला. यादव आणि हुडा यांनी पाचव्या गडय़ासाठी अभेद्य 62 धावांची भागिदारी केली. यादवने पाच चौकारांसह नाबाद 34 तर हुडाने 2 चौकारांसह नाबाद 26 धावा जमविल्या.
संक्षिप्त धावफलक
विंडीज 43.5 षटकांत सर्वबाद 176 (होल्डर 57, ऍलेन 29, किंग 13, डरेन ब्रॅव्हो 18, ब्रुक्स 12, पुरन 18, जोसेफ 13, यजुवेंद्र चहल 4-49, वॉशिंग्टन सुंदर 3-30, प्रसिद्ध कृष्णा 2-29, मोहम्मद सिराज 1-26)
भारत 28 षटकांत 4 बाद 178 (रोहित शर्मा 60, कोहली 8, इशान किशन 28, पंत 11, सुर्यकुमार यादव नाबाद 34, दीपक हुडा नाबाद 26, जोसेफ 2-45, अकिल हुसेन 1-46).
लता मंगेशकरांना आदरांजली
भारताच्या गानसम्राज्ञी श्रीमती लता मंगेशकर यांचे मुंबइत रविवारी वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाल्याने संपूर्ण देशामध्ये दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला. भारतीय क्रिकेट मंडळाने लता मंगेशकर यांना आदरांजली वाहिली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी भारत आणि विंडीज यांच्यातील पहिला वनडे सामना खेळविला गेला. हा सामना सुरू होण्यापूर्वी स्टेडियमच्या बाहेर तिरंगा ध्वज अर्ध्यावर फडकविण्यात आला होता. सामना सुरू होण्यापूर्वी भारतीय संघातील खेळाडूंनी दंडाला काळय़ा फिती बांधून मैदानात प्रवेश करत लता मंगेशकर यांना आदरांजली वाहिली. 2001 साली लता मंगेशकरांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देवून शासनातर्फे गौरविण्यात आले होते.