वृत्तसंस्था/ कोलंबो
भारताचा क्रिकेट संघ सध्या लंकेच्या दौऱयावर वनडे आणि टी-20 मालिका खेळण्यासाठी दाखल झाला आहे. भारतीय संघाचे नेतृत्व शिखर धवनकडे आहे तर यजमान लंकन संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी आता कुसल परेराऐवजी अष्टपैलू दसुन शनाकाकडे सोपविण्यात आली आहे.
उभय संघातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला 13 जुलैपासून प्रारंभ होणार आहे. या मालिकेतील सामने 13, 16 आणि 18 जुलै रोजी होणार आहे. त्यानंतर उभय संघात कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर 21, 23, 25 जुलै रोजी टी-20 चे तीन सामने खेळविले जातील.
29 वर्षीय अष्टपैलू शनाका हा वेगवान गोलंदाज तसेच आक्रमक फलंदाजही आहे. या आगामी मालिकेसाठी लंकन निवड समितीने कुसल परेराच्या जागी पांघलची कर्णधार म्हणून निवड निश्चित केली आहे. गेल्या चार वर्षांच्या कालावधीत लंकन संघाचे सहा कप्तान बदलले गेले. 2018 पासून लंकन संघाचे नेतृत्व चंडिमल, मॅथ्यूज, मलिंगा, करुणारत्ने, कुसल परेरा यांनी केले होते. शनाकाच्या नेतृत्वाखाली लंकेने 2019 साली तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत पाकचा एकतर्फी पराभव केला होता. या कामगिरीमुळे लंकन निवड समितीने शनाकाकडे पुन्हा नेतृत्व देण्याचा निर्णय घेतला आहे.