उंब्रज:
जिल्हाचा हाँटस्पाँट ठरलेल्या वनवासमाची ता.कराड येथे बुधवारी जिह्यातील वरिष्ठ अधिकायांनी भेट देवून परिस्थितीची पाहणी केली. जिल्हाधिकारी शेखरसिंह, मुख्यकार्यकारी संजय भागवत, जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्विनी सातपुते, आरोग्य अधिकारी डॉ सुनिल कोरबु यांनी भेट देवुन पाहणी केली. यावेळी वनवासमाचीतील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वानी प्रयत्न करावेत असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.
कराड तालुक्यात आत्तापर्यंत कोरोनाचे 89 रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी एकटय़ा वनवासमाची गावात 38 रुग्ण असुन गाव भेदरलेल्या स्थितीत आहे. दिवसेंदिवस येथे कोरोनाची साखळी तयार झाल्याचे उघडकीस येत असून प्रशासनाची चिंता वाढली आहे. स्थानिक प्रशासनासह, उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्र, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय तसेच कृष्णा हाँस्पिटल कराड यांच्या माध्यमातून कोरोनाची साखळी तोडण्याचे काम सुरू आहे. जिल्हा प्रशासनाने वनवासमाचीच्या वाढत्या कोरोना संख्येची गांभीर्याने दखल घेतली असून त्या अनुषंगाने बुधवारी सातारचे जिल्हाधिकारी शेखरसिंह, मुख्यकार्यकारी संजय भागवत, जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्विनी सातपुते, आरोग्य अधिकारी डॉ सुनिल कोरबु यांनी भेट देवून परिस्थितीची पाहणी केली. वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कुंभार यांनी वनवासमाचीतील ग्राउंड रिपोर्टची माहिती दिली.
वनवासमाचीतील कोरोना साखळी खंडित करण्यासाठी आवश्यक सर्व उपाय योजना कराव्यात. 60 वर्षे वयावरील जेष्ठ नागरिक तसेच रक्तदाब, मधूमेह, इत्यादी आजार असणाया नागरीकांची तपासणी करावी व जादा लक्ष द्यावे.
गरोदर माता यांची सुध्दा प्रसूती पुर्व तपासणी करावी. सर्व कर्मचारी यांनी फेस मास्क, शिल्डचा वापर करावा. अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिल्या. तसेच कोरोना संसर्गजन्य आजारात आता पर्यंत खुप चांगले काम केले असून त्याबद्दल त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले. तसेच साखळी खंडित करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले. यावेळी वनवासमाचीतील कोरोना साखळी तयार होण्याचे कारण तसेच सध्य परिस्थितीत प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या उपाययोजना याबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कुंभार यांनी वास्तविक परिस्थितीची माहिती वरिष्ठांना दिली.