प्रतिनिधी/ उंब्रज
रविवारी दिवसभरात एकही कोरोना बाधित न सापडल्याने वनवासमाचीकरांचा जीव भांडय़ात पडला होता. या आनंदावर दुसऱयाच दिवशी विरजण पडले असून सोमवारी आणखी एका 21 वर्षीय महिलेस कोरोनाची लागण झाली असल्याचे अहवाल प्राप्त झाल्याने वनवासमाचीवर कोरोनाची वक्रदृष्टी कायम आहे. शनिवारी एकाच कुटुंबातील चारजण कोरोना बाधित झाले होते. त्याच कुटुंबातील ही 21 वर्षीय महिला असल्याचे स्थानिक आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात आले. दरम्यान कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या आणखी 12 जणांच्या घशाचे स्त्राव तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.
कराड तालुक्यातील वनवासमाची येथील कोरोना बाधितांची संख्या आठवर गेल्याने जिह्यातील सर्वाधिक रुग्ण एकटय़ा वनवासमाची गावात आहेत. त्यात कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या 70 जणांना क्वारंटाईन करण्यात आले असून निकट सहवासात आलेल्याच्या घशाचे स्त्राव तपासणीसाठी घेण्यात आले आहे. तसेच रविवारी 18 व सोमवारी 12 जणांच्या घशाचे स्त्राव घेण्यात आले असून त्यांचे रिपोर्ट येणे अद्याप बाकी आहे. यापूर्वी घेतलेल्या स्त्रावांपैकी काही जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने थोडाफार दिलासा आहे. शनिवारी प्राप्त झालेल्या अहवालानंतर गावकऱयांसह प्रशासनाला धडकी भरली होती. एकाच वेळी कुटुंबातील चौघांचे अहवाल कोरोना बाधित आले होते. त्याच कुटुंबातील 21 वर्षीय महिला आता कोरोना बाधित झाल्याचे सोमवारी उघडकीस आले आहे त्यामुळे या कुटुंबातील पाचजणांना कोरोना झाल्याने भीतीचे वातावरण आहे. सद्यस्थितीत वनवासमाची या एका गावातील कोरोना बाधितांची संख्या आठवर गेली असून वनवासमाचीत कोरोना येण्याचे कारण हे बाबरमाची कनेक्शन असून बाबरमाचीच्या रुग्णाचे नागपूर कनेक्शन असल्याची साखळी उघड होत आहे. यातील 32 वर्षीय तरुण सुरुवातीला बाधित सापडला. त्यानंतर त्यांची पत्नी व 13 वर्षाच्या मुलांना कोरोनाची लागण झाली. या संपर्कातून शेजारील कुटुंबाला कोरोनाची झळ बसली असून आत्तापर्यंत पाचजण कोरोना बाधित झाले आहेत. सर्व परिस्थितीवर आरोग्य विभाग व प्रशासन लक्ष ठेवून आहे. दरम्यान मागील आठ दिवसापासून उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कुंभार व आरोग्य पथक वनवासमाचीत कार्यरत असून ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्व पातळ्यांवर काम सुरू आहे.