प्रतिनिधी/ उंब्रज
संपूर्ण जगभरात थैमान घालणाऱया कोरोनाच्या चपेटमध्ये वनवासमाची सापडली आहे. एकाच कुटुंबातील तब्बल आठ जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याने सर्वत्र खळबळ माजली. मंगळवारी गावातील आणखी तिघांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने ग्रामस्थांची गाळण उडाली. सध्या गावातील कोरोना बाधितांची संख्या 11 वर जाऊन पोहोचली असून दिवसभरात आणखी 50 जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. बाधितांच्या संपर्कात आलेल्या ग्रामस्थांची संख्या वाढू लागल्याने नमुने घेण्यासाठी रुग्णालयाची व्हॅन मंगळवारी गावात आणण्यात आली. सध्या कोरोनाचे दाट सावट गावावर आहे. एकीकडे कोरोनाचा उद्रेक तर दुसरीकडे संपूर्ण लॉकडाऊन यामुळे मनामनात धडकी भरलेली आहे. तरीही ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी गावात तळ ठोकून असलेले वैद्यकीय पथक, प्रशासन हेच सध्या गावकऱयांसाठी आशेचे किरण बनले आहेत.
वनवासमाची येथे मागील चार दिवसात एकाच कुटुंबातील चौघांना कोरोनाची लागण झाली होती. दोन दिवसात हा आकडा आठ वर गेला असून तीन महिला व एका पुरुषाची मंगळवारपर्यंत कोरोना बाधितात भर पडली. यापूर्वी या कुटुंबातील कोरोना बाधित असलेल्या वृद्ध भावांसह, तीन वर्षाचा नातू, त्यातील एकाची पत्नी, एकाचा 55 वर्षीय मुलगा व 50 वर्षीय सून यांच्यासह तब्बल आठ जणांना कोरोनाची बाधा झाल्याने धोकादायक परस्थिती निर्माण झाली आहे.
मंगळवारी 52 वर्षीय पुरुष व 48 आणि 50 वर्षीय महिलांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. कराड तालुक्यातील कोरोना बाधितांचा आकडा 31 वर पोहोचला असून एकटय़ा वनवासमाची गावात कोरोना बाधितांचा आकडा झपाटय़ाने वाढत आहे. आठ दिवसात 11 रुग्ण सापडल्याने ग्रामस्थ आणि प्रशासनाची चिंता वाढली आहे. बाबरमाची येथील कोरोना बाधिताच्या संपर्कात आल्याने वनवासमाची येथील 32 वर्षीय युवकाचे रिपोर्ट 21 एप्रिल रोजी पाँझिटीव्ह आले होते. त्यानंतर आरोग्य विभागाने वनवासमाची गावाला गांभीर्याने घेऊन बाधितांच्या संपर्कात आलेल्या इतर लोकांचा शोध घेण्याचा प्रयत्न युध्दपातळीवर सुरू केला. जवळपास शंभरहून अधिक जणांना होम क्वारंटाईन केले तसेच जवळून संपर्कात आलेल्या 60 हून अधिक जणांची आत्तापर्यंत तपासणी करण्यात आली. त्यामध्ये या युवकाच्या पत्नीस तसेच 13 वर्षाच्या मुलालाही कोरोनाची लागण झाल्याने उपचार सुरू करण्यात आले आहेत. कोरोनाची ही साखळी या युवकाच्या घरापुरताच मर्यादित राहिली नाही तर शेजारच्या घराला कोरोनाने चपेटात घेतले. 21 रोजी सापडलेल्या पहिल्या बाधिताच्या घराचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे हे कुटुंब जेवणावळीसाठी शेजारच्या एका कुटुंबाच्या आश्रयाला आले होते. आता या कुटुंबातील तीन वर्षाच्या बालकासह वृद्ध संख्ये भाऊ, त्यातील एकाची पत्नी, तसेच एकाचा 55 वर्षीय मुलगा व 50 वर्षीय सून यांच्यासह तब्बल आठ जणांना कोरोनाची बाधा झाल्याने धोकादायक परिस्थिती आहे.
21 एप्रिलला पहिला कोरोना पॉझिटिव्ह वनवासमाचीत सापडला. त्यानंतर बाधितांचा आकडा वाढतच असून आत्तापर्यंत 142 हून अधिक जणांची तपासणी करण्यात आली आहे. तसेच बहुतांश ग्रामस्थांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. साथ आटोक्यात येईल असे वाटत असतानाच मंगळवारी आणखी तिघेजण सापडल्याने एकच खळबळ माजली. दक्षता म्हणून बाधितांच्या संपर्कात आलेल्या 50 जणांचे नमुने तपासणी घेण्यासाठी कृष्णा हॉस्पिटलची नमुने तपासणी घेणारी व्हॅन वनवासमाचीत आणण्यात आली. वनवासमाचीत कोरोना येण्याचे कारण हे बाबरमाची कनेक्शन असून बाबरमाचीच्या रुग्णाचे नागपूर कनेक्शन आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कुंभार व आरोग्य पथक लक्ष ठेवून आहे. गावात शंभर टक्के लॉकडाऊन असून ग्रामस्थांना जीवनावश्यक वस्तूंसह सर्व पातळ्यांवर मदत मिळवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.