प्रतिनिधी / शिये, कोल्हापूर
भुयेवाडी (ता. करवीर) येथे गव्याने केलेल्या हल्ल्यात एक युवक ठार झाला तर दोघे जखमी झाले. शनिवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडलेल्या या थराराने भुयेवाडी पंचक्रोशीत घबराटीचे वातावरण पसरले असून जिल्हÎात खळबळ उडाली आहे. सौरभ संभाजी खोत (वय 21, रा. भुयेवाडी) असे मृत युवकाचे नाव आहे. तर प्रल्हाद पाटील (वय 55), शुभम महादेव पाटील (वय 24, दोघे रा. भुयेवाडी) अशी जखमींची नावे आहेत. गव्याचा हल्ला इतका भीषण होता की सौरभच्या बरगडीच्या खाली पोटात शिंग मारल्याने त्याची आतडी आणि फुफ्फुसे बाहेर आली होती.
दरम्यान, गव्याने केलेल्या हल्ल्याच्या घटनेची माहिती समजताच पोलिसांसह वनविभागाचे अधिकारी भुयेवाडीत दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आली असून नागरिकांनाही सावधानता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले होते.
कोल्हापूर शहरात पंचगंगा नदीकाठी शुक्रवारी दिवसभर ठाण मांडून बसलेला गवा सायंकाळनंतर लक्षतीर्थ वसाहतीजवळ असलेल्या आयडिल कॉलनीजवळच्या उसाच्या शेतात शिरला होता. दरम्यान, अंधार पडल्यानंतर त्याचे निश्चित स्थान समजत नव्हते. रात्रीच्या अंधारात गव्याने शिये-भुये परिसरात प्रवेश करून तो जोतिबा-पन्हाळा परिसरात गेल्याची माहिती शनिवारी वन अधिकाऱयांनी दिली होती. शनिवारी सायंकाळी भुयेवाडी परिसरात गव्याचे दर्शन झाल्याने खळबळ उडाली. गावात चर्चेला उधान आले. नागरिक गटागटाने गव्याची चर्चा करत होते.
सायंकाळी साडेसातच्या सुमारास गावातील वारणा बझार जवळील ऊसाच्या शेतात गवा आला. त्याला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. गर्दी पाहून गव्याने गावातीलच हरणेश्वर नगराकडे मोर्चा वळविला. तेथे प्रल्हाद पाटील यांच्या गुऱहाळघराच्या मागील बाजूस असणाऱया उसाच्या फडात गवा शिरला. प्रल्हाद पाटील त्या ठिकाणी होते. अचानक दबा धरून बसलेल्या गव्याने थेट प्रल्हाद पाटील यांच्यावर हल्ला चढविला. गव्याचे शिंग पाटील यांच्या डाव्या पायाला लागल्याने गंभीर दुखापत झाली. जखमी अवस्थेत ते आरडा ओरडा करत उसाच्या फडातून बाहेर पळत सुटले. त्यांच्या मेलो मेलो, गव्याने मारले या आवाजाने जमलेल्या नागरिकांनी त्यांच्याकडे धाव घेतली. जखमी अवस्थेत त्यांना आधार देत तातडीने दवाखान्यात उपचारार्थ दाखल केले. यानंतर शुभम महादेव पाटील या युवकालाही गव्याने जखमी केले. त्याला दुखापत झाली असली तरी सुदैवाने त्याचा जीव वाचला.
मोबाईलमुळे समजली सौरभची माहिती
जखमी प्रल्हाद पाटील यांना पेठ वडगावच्या खासगी दवाखान्यात दाखल करण्यासाठी गावातील काही युवक गेले. शुभम पाटील यालाही गावातील दवाखान्यात नेण्यात आले. याच दरम्यान गर्दीत सौरभ खोत दिसत नसल्याचे काहींच्या लक्षात आले. त्यांनी सौरभचा शोध सुरू केला. हाका मारूनही प्रतिसाद न मिळाल्याने युवकांनी उसाच्या फडात जावून पाहिले. नातेवाईकांसह मित्रांनी सौरभच्या मोबाईलवर कॉल करणे सुरू केले. रिंग होत होती, पण कॉल स्वीकारला जात नव्हता. त्यामुळे सर्व जण चिंतेत होते. शोध सुरू असताना उसाच्या फडाजवळच एक मोबाईल पडलेला दिसला.
त्या ठिकाणी काहीशा अंतरावर गव्याच्या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी झालेला सौरभ दिसला. गव्याने सौरभच्या पाठित शिंग मारलेल्याने त्याची फुफ्फुसे, आतडी बाहेर आली होती. प्रचंड रक्तस्त्राव झाला होता. हा प्रकार सर्वधारणपणे साडेसात पावणे आठच्या सुमारास कळल्यानंतर गंभीर जखमी, बेशुद्ध अवस्थेत असलेल्या सौरभला तातडीने कोल्हापूरच्या सीपीआर रूग्णालयात आणण्यात आले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
सीपीआरमध्ये भुयेवाडीतील नागरिकांची गर्दी
सौरभच्या मृत्युची माहिती मिळताच भुयेवाडीत गावातील नागरिकांनी, युवकांनी सीपीआरमध्ये गर्दी केली होती. सीपीआर पोलीस चौकीत सौरभच्या मृत्युची नोंद करण्यात आली. त्याचे शवविच्छेदन करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
सौरभच्या जाण्याने गावावर शोककळा
मृत सौरभ हा भुयेवाडीच्या माजी सरपंच सौ. पूजा खोत व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संभाजी खोत यांचा मुलगा आहे. सौरभने कोल्हापुरातील महावीर कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. पुढील शिक्षणही तो घेत होता. त्याच्या पश्चात आई, वडील, आजी, आजोबा, लहान भाऊ असा परिवार आहे. सौरभच्या मृत्युने हळहळ व्यक्त होत असून गावावर शोककळा पसरली आहे.
गवा पन्हाळा-जोतिबा मार्गे भुयेवाडीत
कोल्हापुरातून शनिवारी गवा पन्हाळा-जोतिबा परिसरात गेला होता. तने भुयेवाडीत गेल्यानंतर हल्ल्याचा प्रकार घडला. अचानक घडलेल्या या प्रकाराने खळबळ उडाली.
सौरभ खोत उसाच्या फडात गेला कसा आणि कधी ?
गव्याचे दर्शन झाल्यानंतर गावात सावधानता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले होते. गवा असलेल्या ठिकाणी नागरिक गर्दी करून जात होते. या गर्दीतून सौरभ खोत केव्हा उसाच्या फडात गेला, त्याच्यावर गव्याने नेमका कसा हल्ला केला, हे समजले नाही. मोबाईलच्या माध्यमातून शोध सुरू झाल्यानंतर प्रकार उघडकीस आला. सौरभ उसाच्या फडात गेला नसता तर त्याचा जीव हाकनाक गेला नसता, अशी चर्चा गावात सुरू होती.
बिथरलेला गवा पोहाळेच्या दिशेने, नागरिकानो सावधान
रात्री उशिरापर्यंत रेसक्यु टिम कडुन गव्याच्या मागावर होते. वनविभागाच्या अधिकाऱयांकडुन परिसराची पाहणी सुरू होती. दरम्यान, करवीरचे वनक्षेत्रपाल कांबळे, वनपाल विजय पाटील, कृष्णात दळवी यांनी गवा बिथरला असून तो पोहाळे गावाच्या दिशेने गेला आहे. परिसरातील नागरिकांसह शेतकऱयांनी सावध राहावे, असे आवाहन केले आहे.
जोतिबाच्या भाविकांना आवाहन
जोतिबाच्या दर्शनासाठी डोंगरावर वाहनाने जाणाऱया भाविकांनी सावध राहावे. तसेच शिये ते भुयेवाडी, केर्ली, दानेवाडी, गिरोली आणि कुशिरे या दरम्यान गवा असून या भागातील नागरिकांनीही सावधानता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने केले आहे.
सादळे – मादळे परिसरात गव्याची शोध मोहीम सुरु येथे क्लिक करत पहा व्हिडीओ
https://fb.watch/9RvBeL-7qx/