खरेदी-विक्री आणि प्रक्रिया युनिट सुरू करणार
प्रतिनिधी / सावंतवाडी:
सिंधदुर्ग जिल्हय़ात पारंपरिकरित्या होत असलेल्या बांबू लागवडीला केंदीय मंत्री असताना सुरेश प्रभू यांनी 25 वर्षांपूर्वी शाश्वत विकासांतर्गत व्यावसायिक स्वरुप देण्यास प्रारंभ केला. त्यांनी जिल्हय़ात बांबू मिशन सुरू करून बांबू लागवडीच्या माध्यमातून शेतकरी आणि बांबू कुटिर उद्योगावर अवलंबून असलेल्या कुटुंबाचा आर्थिक विकास कसा होईल, याकडे लक्ष दिले. कॉनबॅकच्या माध्यमातून त्यांनी बांबूची चळवळ जिल्हय़ात राबविली. त्यांनी केलेल्या प्रयोगाची फळे शेतकरी, कुटिर उद्योगावर अवलंबून असलेली कुटुंब चाखत आहेत. त्याला आता सिंधुदुर्गात वनविभाग बांबू खरेदी-विक्री केंद्र सुरू करून मदतीचा हात देणार आहे. सिंधुदुर्गात बांबू खरेदी-विक्री केंद्र आणि प्रक्रिया युनिट सुरू केले जाणार आहे.
यासंदर्भात वनविभागाच्या नागपूर येथील मुख्य वनसंरक्षकांनी हिरवा कंदिल दाखवला. त्यामुळे बांबू उत्पादक शेतकऱयांना जिल्हय़ातच हक्काची बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. बांबू उत्पादक शेतकऱयांना मुंबई मार्केटवर अवलंबून राहावे लागणार नाही.
कॉनबॅकची चळवळ
सिंधुदुर्गात शेतीला पूरक म्हणून बांबूची लागवड केली जाते. ही लागवड
प्रामुख्याने पारंपरिक पद्धतीने केली जाते. सिंधुदुर्गातील बांबू प्रामुख्याने विक्रीसाठी मुंबईला पाठविला जातो. त्यातून शेतकऱयांच्या हातात पैसे येतात. अलिकडच्या काळात बांबूची लागवड पैसे मिळत असल्याने मोठय़ा प्रमाणात होऊ लागली आहे. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी सिंधुदुर्गात बांबू लागवडीला प्रोत्साहन दिले. त्यांनी ‘कॉनबॅक’च्या माध्यमातून बांबूपासून विविध वस्तू बनवून त्याला मार्केट कसे उपलब्ध होते, याचा अनुभव लोकांसमोर मांडला. बांबूपासून विविध वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण कॉनबॅकच्या माध्यमातून देण्यात आले. त्यामुळे अनेकांना रोजगार मिळाला.
कॉनबॅक बांबूपासून विविध वस्तू बनविते. अशा वस्तुंना परदेशात मागणी आहे. या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱयांनी उत्पादीत केलेला बांबू खरेदीही केला जातो. प्रभू यांनी जिल्हय़ात बांबू लागवडविषयक राबविलेल्या चळवळीमुळे बांबू लागवडीला प्रोत्साहन मिळून शेतकऱयांची आणि या कुटिर उद्योगावर अवलंबून असलेल्या कुटुंबांची आर्थिक उन्नती झाली.
वनविभागातर्फे प्रक्रिया युनिट होणार
आता वनविभागही सिंधदुर्गात बांबू खरेदी-विक्री केंद्र आणि प्रक्रिया युनिट सुरू करणार आहे. दिवाळीपूर्वी हे केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे बांबू उत्पादक शेतकऱयांना बांबूची बाजारपेठ जिल्हय़ातच उपलब्ध होणार आहे. उपवनसंरक्षक शहाजी नारनवर यांनी या संदर्भात नागपूर येथील मुख्य वनसंरक्षकांशी चर्चा झाल्याचे सांगितले.
बांबू डेपोचा यापूर्वीही प्रयत्न
दरम्यान, कॉनबॅकचे मोहन होडावडेकर यांनी सांगितले की, सिंधुदुर्गात बांबू खरेदीचा प्रश्न नाही. उत्पादीत माल जाग्यावर खरेदी केला जातो. ‘कॉनबॅक’च्यावतीनेही बांबू खरेदी होते. तसेच त्यावर प्रक्रियाही होते. यापूर्वी वनविभागाने सिंधुदुर्गात बांबू डेपो उभारण्याचा प्रयत्न केला होता. वनविभागाची सध्याची संकल्पना नेमकी काय आहे, याचा माहिती घ्यावी लागेल. त्यानंतर यासंदर्भात बोलणे उचित होईल.