वन्यजीवांच्या मृत नोंदीत येणार पारदर्शकता : मुख्य वन संरक्षणाधिकाऱयांची सूचना
प्रतिनिधी /बेळगाव
वन्यप्राण्यांच्या मृत्यूची संपूर्ण माहिती सर्वसामान्यांबरोबर वन्यप्रेमींना उपलब्ध करून देण्याच्या दिशेने वनखात्याने पाऊल टाकले आहे. मुख्य वनसंरक्षण अधिकारी विजयकुमार गोंगी यांनी वनविभागाच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाला वन्यप्राण्यांच्या मृत्यूचे सर्व तपशील आणि पंचनाम्याची माहिती वनविभागाच्या स्वतंत्र वेबसाईटवर नोंद करण्याचे आदेश दिले आहेत. वन्यजीवांचे संवर्धन आणि संरक्षणासाठी खात्याने हा निर्णय घेतला आहे.
राज्यातील विविध अभयारण्ये आणि इतर वनक्षेत्रात वन्यप्राण्यांची हत्या वारंवार होत असल्याची अनेक प्रकरणे घडत आहेत. मात्र, याकडे दुर्लक्ष होत आहे. शिवाय नैसर्गिक मृत्यूबरोबरच वन्यप्राण्यांच्या संशयास्पद मृत्यूची माहिती वन्यप्रेमी व पर्यावरणप्रेमींना देणे आवश्यक आहे. वन्यप्राण्यांच्या मृत्यूची माहिती वेबसाईटवर अपलोड झाल्यास त्यांच्या संरक्षणाचे काम पारदर्शकपणे होण्यास मदत होणार आहे.
वन्यजीवांच्या संरक्षणाबरोबर संवर्धनासाठी वनखात्याचे प्रयत्न सुरू आहेत. वन्यजीवाच्या मृत्यूची माहिती आता वेबसाईटवर दिली जाणार आहे. जंगलातील वन्यप्राणी अन्न व पाण्याच्या शोधार्थ फिरत असतात. यावेळी प्राण्यांची रेल्वे ट्रकवरूनही ये-जा सुरू असते. दरम्यान, भरधाव रेल्वेगाडय़ांची धडक बसून अनेक वन्यप्राण्यांना जीव गमवावा लागत आहे. अशा वन्यप्राण्यांची खात्याच्या वेबसाईटवर नोंद केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना वनप्राण्यांच्या मृत्यूची माहिती मिळणार आहे.
अलीकडे राज्याच्या वनक्षेत्र वाढीबरोबरच वन्यप्राण्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. मात्र काही नैसर्गिक आणि इतर कारणांमुळे वन्यप्राण्यांचा मृत्यू होतो. वन्यप्रेमींच्या मृत्यूच्या माहितीपासून वन्यप्रेमींना वंचित राहावे लागत होते. वन्यप्राण्यांच्या मृत्यूची माहिती तातडीने वेबसाईटवर उपलब्ध करण्याचा निर्णय वनखात्याने घेतला आहे. राज्यात कोणत्याही ठिकाणी वन्यजीवांचा मृत्यू झाल्यास त्यांची संपूर्ण माहिती वेबवर उपलब्ध करण्याची सूचना मुख्य वन संरक्षणाधिकाऱयांनी दिली आहे.