जगातील शहरांचे चित्रच पालटणार
स्वीडन स्वतःच्या शहरांना अधिक उत्तम स्वरुप देण्यासाठी एका नव्या योजनेवर काम करत आहे. यांतर्गत पार्किंग जागेलाही उत्तम करण्यात येणार असल्याने तेथील शहरी जीवन अधिकच सुलभ ठरणार आहे. या प्रायोगिक प्रकल्पाला ‘वन मिनिट सिटी’ नाव देण्यात आले आहे. या प्रकल्पाच्या अंतर्गत स्वीडनमधील प्रत्येक गल्लीला री-डिझाइन केले जाणार आहे. पायी चालणारे आणि सायकलस्वारांना यात प्राथमिकता मिळणार असून प्रकल्पात काररहित शहराची कल्पना करण्यात आली आहे.
स्वीडनच्या गोथेनबर्ग शहरात एका सॉसेस शॉपसमोर काही दिवसांपूर्वी एक वाहनतळ होता, पण तेथे आता एक बेंच, पिकनिक टेबल, सायकल आणि स्कुटरचे रॅक तयार करण्यात आले आहेत. तेथे लोक सहजपणे गप्पागोष्टी, करू शकतात, खाद्यपदार्थांवर ताव मारण्यासह मनोरंजन करू शकतात.
स्थानिक रहिवासी होणार स्थापत्यकार
या प्रकल्पात स्थानिक रहिवाशांना सामील केले जाईल आणि त्यांना त्यांच्या गल्लीच्या ले-आउटचा स्थापत्यकारही करण्यात येणार आहे. गल्लीला कुठले स्वरुप द्यावे हे स्थानिकांकडून जाणून घेण्यात येणार असून याकरता कार्यशाळा होणार आहेत. गल्लीतील किती हिस्सा वाहनतळ म्हणून वापरण्यात यावा किंवा तेथे सार्वजनिक जागा उपलब्ध करावी हे विचारण्यात येणार आहे. स्टॉकहोमच्या 4 भागांमध्ये हा प्रकल्प सुरू झाला असून लवकरच आणखीन तीन शहरे यात सामील होतील. 2030 पर्यंत स्वीडनमधील प्रत्येक गल्लीचे वातावरण आरोग्यदायी, शाश्वत करण्याची योजना आहे.
उर्वरित जगापेक्षा आघाडीवर
जगातील अन्य देश सध्या 15 मिनिटांच्या प्रारुपावर काम करत असून यांतर्गत नेबरहुड पातळीवर शहर नियोजन करण्यात येत आहे. खासकरून कोरोनानंतर पॅरिसचे महापौर एने हिडालगो यांनी शहराला या प्रारुपावर विकसित करण्याचे काम हाती घेतले आहे. यांतर्गत लोकांना घरापासून 15 मिनिटांच्या अंतरावरच (पायी किंवा सायकलच्या वापरासह) प्रत्येक सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. तर स्वीडनमध्ये प्रत्येक गल्लीचे री-डिझाइन करण्यात येत आहे.