प्रतिनिधी/ बेळगाव
शहर परिसरात शुक्रवारी वरमहालक्ष्मीची पूजा भक्तिभावाने व श्रद्धेने पार पडली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा घरापुरतीच ही पूजा करण्यात आली. लक्ष्मीचे रूप म्हणून कलशावर मुखवटा ठेवून तिला गर्भरेशमी वस्त्र नेसवून दागिने आणि फुलांनी सजविण्यात आले. पूजा आणि आरती झाल्यानंतर पुरणावरणाचा नैवेद्य पार पडला.
यानिमित्त बोलाविलेल्या सुवासिनींचे औक्षण करून त्यांच्या हाताला चंदन लावण्यात आले. लक्ष्मीचे रूप समजून त्यांची पानसुपारी, श्रीफळ व हरभरे यांनी ओटी भरण्यात आली. सायंकाळी मर्यादित स्वरुपात हळदीकुंकू झाले. कोरोनामुळे सामाजिक अंतर पाळण्याचे बंधन असल्याने यंदा घरोघरी येणाऱया महिलांची संख्या हेतूतः नियंत्रित करण्यात आली.
पूजेसाठी आवश्यक फळे, पाच फळांचा संच, फुले यांच्या खरेदीसाठी शुक्रवारी सकाळीसुद्धा बाजारपेठेत गर्दी झाली. आरती आणि प्रार्थना करताना सर्वच महिलांनी अखंड सौभाग्य, धनधान्य समृद्धी, संतानप्राप्ती याबरोबरच लवकरात लवकर कोरोनाचे संकट टळो, अशी अपेक्षा व्यक्त केली.