प्रतिनिधी/ कराड
सातारा जिल्हय़ात वन्यप्राणी व मानव संघर्ष वाढत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करून वराडे (ता. कराड) येथे वन्यजीवांवर उपचार व देखभाल करण्यासाठी अत्याधुनिक असे वन्यजीव उपचार केंद्र (ट्रांझिट ट्रिटमेंट सेंटर) मंजूर झाले असून त्यासाठी 7 कोटी 58 लाख रुपयांचा निधी नुकताच उपवनसंरक्षक सातारा यांचे कार्यालयाकडे वर्ग झाला असल्याची माहिती पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
वराडे येथे वन्यजीव उपचार केंद्र मंजूर करण्याची मागणी शासनाकडे केली होती. त्या अनुषंगाने शासनाकडून 7 कोटी 58 लाख रूपये मंजूर झाले आहेत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये वन्यजीवांकरीता अत्याधुनिक उपचार पद्धतीने सुसज्ज असे वन्यजीव उपचार केंद्र मंजूर झाले असून याचा फायदा सातारा जिल्हय़ाबरोबरच कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग ,रत्नागिरी तसेच सहयाद्री व्याघ्र प्रकल्पातील जखमी वन्यजीवांना तातडीचे उपचार देणेकरीता होणार आहे. सद्यस्थितीमध्ये जखमी वन्य प्राण्यांवर उपचार करणे करिता पशुवैद्यकीय दवाखान्यातील उपलब्ध सुविधांचा वापर करावा लागतो. परंतु वन्यप्राण्यांवर उपचार करण्यासाठी वेगळ्या सुविधांची आवश्यकता असते. वन्य प्राण्यांवर उपचार करताना कमीत कमी मानवी संपर्क व तातडीने उपचार करून लवकरात लवकर त्यांना मूळ अधिवासामध्ये सोडणे आवश्यक असते. या दृष्टीने आवश्यक उपचारपद्धती रेडिओथेरपी, पोर्टेबल एक्स-रे यांसारख्या अद्ययावत सुविधांनी हे उपचार केंद्र सुसज्ज असणार आहे. सदर उपचार केंद्रामध्ये मांसभक्षी प्राणी ा पक्षी, तृणभक्षी प्राणी ा पक्षी, जलचर प्राण्यांसाठी वेगवेगळय़ा पिंज-यांची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी त्यांना आवश्यक असणाऱया नैसर्गिक अधिवासाशी मिळते जुळते असे वातावरण तयार करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत गेल्या वर्षी महाराष्ट्रात ठिकठिकाणी वन्यजीवांच्या उपचारासाठी ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर उभारण्यासाठी घोषणा केली. त्याअनुषंगाने सातारा जिल्हाचे मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे ह्यांनी जिल्हा प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करून जागेच्या निवडी पासून ते नकाशा तयार करण्यापर्यंत प्रशासनाला मोलाचे सहकार्य केले असल्याचे त्यांनी सांगितले.
पालकमंत्री पाटील ह्यांनी वराडे येथे भेट देऊन उपयुक्त व मोलाच्या सूचना केल्या. सदर उपचार केंद्र मंजूर होण्याकरीता प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये, तत्कालीन मुख्य वनसरंक्षक डॉ. व्ही. क्लेमेंट बेन, सध्याचे मुख्य वनसंरक्षक श्री. आर. एम. रामानुजनम, उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांनी सकारात्मक प्रयत्न केले.