फिरोज मुलाणी / औंध
उत्तर प्रदेश (गोंडा) येथे झालेल्या वरीष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्रच्या शिवराज राक्षेने उत्तर भारतीय मल्लांचे तगडे आव्हान मोडून काढीत खुल्या गटात सुवर्णपदक मिळवले. फ्रीस्टाईल प्रकारात पुरुष व महिला मल्लानी दोन रौप्य आणि सात कास्य ग्रीकोरोमनमध्ये देखील तीन कास्यपदकासह महाराष्ट्राच्या संघाने दहा कास्यपदकाची कमाई करीत घवघवीत यश प्राप्त केले. पाच पदके मिळवित कोल्हापूरच्या मल्लांनी कुस्तीपंढरीचा झेंडा अयोध्येत फडकावला.
सातारा येथे झालेल्या राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलेल्या महाराष्ट्रातील मल्लानी वरीष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत पदकांची लयलूट करीत उत्तर भारतातील मल्लांना चांगलीच झुंज दिली. खुल्या गटात अर्जुनवीर काकासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे येथे सराव करीत असलेल्या शिवराजने खुल्या गटात हरियानाच्या मोहित कुमारला अंतिम फेरीत तीन विरुद्ध एक गुणांनी नमवून सुवर्णपदक पटाकावले. शिवराजने अंतिम फेरीपर्यंतच्या सर्वच लढतीत प्रतिस्पर्धी मल्लांचा तांत्रिक गुणावर फडशा पाडत एकतर्फी विजय मिळवून आपण भरात असल्याचे सिद्ध केले. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या तोंडावर शिवराजने मिळवलेल्या पदकाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. वरीष्ठ कुस्ती स्पर्धेत खुल्या गटात तब्बल 50 वर्षानंतर सुवर्णपदक मिळाल्याची चर्चा कुस्तीशौकिनांच्यात सुरू आहे. 97 किलो गटात महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर याला अंतिम फेरीत हरियानाच्या सत्यव्रत कडून पराभव पत्करावा लागल्याने त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. 92 किलो गटात कुस्तीपंढरीचा आंतरराष्ट्रीय मल्ल पृथ्वीराज पाटील याला कास्यपदकावरच समाधान मानावे लागले. 86 किलो गटात सोलापूरचा वेताळ शेळके याला आज कास्यपदकावर समाधान मानावे लागले.
74 किलो गटात डीवायएसपी नरसिंग यादवने कास्यपदक मिळवले. 57 किलोत आबा अटकळे याने कास्यपदक मिळवून महाराष्ट्राच्या खात्यात आणखी एका पदकाची भर घातली. ग्रीकोरोमनमध्ये मुंबईतील गोकुळ यादव 77 किलो
कोल्हापूरच्या विक्रम कुर्हाडे (नंदगाव) 60 किलो आणि प्रितम खोत67 किलो यांनी देखील कास्यपदकावर मोहोर उटवून कुस्ती पंढरीचा झेंडा फडकावला.
कोल्हापूर जिह्यातील मुरगुडला दादा लवटे यांच्या कडे सराव करीत असलेली आंतरराष्ट्रीय पदक विजेती स्वाती शिंदेची 53 किलो वजनगटात अंतिम फेरीतील झुंज अपयशी ठरली. दिल्लीच्या पूजा घेलावत बरोबरच्या लढतीत स्वाती आघाडीवर असताना शेवटच्या काही क्षणात पिछाडीवर असलेल्या पूजाने मारलेल्या भारंदाज डावामुळे गुणांची आघाडी मिळवून निर्णायक लढतीत पूजाने बाजी मारली. 62 किलोत कोल्हापूरच्या स्रुष्टी भोसलेने कास्यपदकाची कमाई करून कुस्तीपंढरीला आणखी एक पदक मिळवून दिले.
अहमदनगरची आंतरराष्ट्रीय मल्ल भाग्यश्री फंड 59 किलो, आणि सोनाली मंडलिक 57 किलो यांनी कास्यपदकाची कमाई केली. यशस्वी मल्लाचे कुस्ती मार्गदर्शक, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे पदाधिकारी आणि कुस्ती शौकिन यांनी अभिनंदन केले आहे.
डीवायएसपी राहुल आवारे जखमी
61 किलो वजन गटात जागतिक पदक विजेता मल्ल डीवायएसपी राहुल आवारे याच्या कडून महाराष्ट्राला पदकाची अपेक्षा होती. पहिली फेरी जिंकून राहुलने आपले इरादे स्पष्ट केले होते. दुस्रया फेरीत रेल्वेच्या नवीनकुमार बरोबर लढताना त्याच्या मांडीचा स्नायू दुखावला होता जखमी असताना देखील जिद्दीने नवनीतला पराभूत केले होते. मात्र स्नायू दुखावल्यामुळे त्याला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. जखमी झाल्यामुळे महाराष्ट्राला एका पथकाला देखील मुकावे लागले.
आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाचा दबदबा
पुण्यातील आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात अर्जुनवीर काकासाहेब पवार, गोविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत असलेल्या शिवराज राक्षे, हर्षवर्धन सदगीर, वेताळ शेळके, आबा अटकळे, विक्रम कुर्हाडे, प्रितम खोत या मल्लांनी एक सुवर्ण एक रौप्य आणि चार कास्यपदकाची कमाई करीत वरीष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत देखील आंतरराष्ट्रीय कुस्तीसंकुलाची मान उंचावली.