प्रतिनिधी / वास्को
वरूणापुरी ते मुरगाव बंदर दरम्यानचा चौपदरी राष्ट्रीय महामार्गाचे काम येत्या गोवा मुक्ती दिनापर्यंत पूर्ण करणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे. तसेच वास्कोतील कदंब स्थानकाच्या विकासासाठी पुन्हा प्रकीया सुरू करण्यात येणार असून हे काम आता तीन टप्प्यात होणार आहे. येत्या 15 ऑगष्टपर्यंत अग्नीशामक दलाच्या इमारतीच्या कामालाही प्रारंभ होणार आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल गुरूवारी वास्को व मुरगाव मतदारसंघाला भेट दिली. या भेटीत यांनी या दोन्ही मतदारसंघातील विविध विकास कामांचा आढावा घेतला. यात वरूणापुरी ते मुरगाव बंदर दरम्याच्या चौपदरी महामार्गाचाही समावेश असून हा प्रकल्प येत्या डिसेंबर 19 गोवा मुक्ती दिनापर्यंत पूर्ण करण्याचे ठरले आहे. वरूणापुरी ते गांधीनगरपर्यंत जमीनीवरून तर गांधीनगर मुरगाव बंदर व्हाया बायणा समुद्र किनारा हा महामार्ग उड्डाण पुलाव्दारे तयार करण्यात येत आहे. या महामार्गाचे एwशी टक्के काम पूर्ण झालेले आहे. मात्र, मागच्या दोन वर्षांत आर्थिक चणचणीमुळे या महामार्गाचे काम रखडले आहे. हे काम पुन्हा सुरू करण्यासाठी आता पुन्हा प्रयत्न सुरू झालेले आहे. मुख्यमंत्र्यांनी गुरूवारी यासंबंधी बायणात बैठक घेतली व समस्यांबाबत चर्चा केली. यावेळी मंत्री मिलिंद नाईक, राज्याचे मुख्य सचिव परीमल राय तसेच इतर शासकीय अधिकारी महामार्ग तयार करणाऱया गॅमन इंडिया कंपनीचे अधिकारी मुरगावचे नगराध्यक्ष दामू कासकर व मुरगावचे नगरसेवक उपस्थित होते. या महामार्गाचे काम येत्या डिसेंबर अखेर पूर्ण करण्यासाठी आवश्यक सुचना मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आहे. काही अडचणी होत्या त्याही दूर करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. हा प्रकल्प 500 कोटींचा होता आत प्रकल्पासाठी अतिरीक्त खर्च होणार आहे. ऑक्टोबर 2015 साली या कामाला प्रारंभ झाला होता. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर वास्को शहरातील वाहतुकीचा गोंधळ दूर होणार आहे. या प्रकल्पाबरोबरच सडय़ावरील जलतरण तलावाच्या कामाचीही मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. या तलावाचे 90 टक्के काम पूर्ण झालेले असून येत्या चार महिन्यांत उर्वरीत काम पूर्ण करण्यात येणार आहे. मुरगाव मतदारसंघातील रस्त्यांचीही कामे अडलेली असून ती पूर्ण करण्यासाठीही मुख्यमंत्र्यांनी आढावा घेऊन सुचना केल्या.
मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम खाते, जलस्त्रोत खाते, क्रीडा खाते, किनारा विकास, अग्नीशामक दलाची इमारत, वास्कोतील कदंब स्थानक व इतर प्रकल्पांसंबंधी चर्चा करून समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला. ही कामेही लवकरच मार्गी लागणार आहेत. येत्या 15 ऑगष्टला अग्नीशामक दलाच्या इमारतीच्या कामाला प्रारंभ करण्याचे ठरले आहे. वास्कोतील विविध रस्त्यांच्या कामांचाही मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. मच्छीमारी जेटीसंबंधीच्या कामाचीही त्यांनी माहिती घेतली. वास्को मतदारसंघातील कामासंबंधी आढावा बैठक दुपारी बायणातील रवींद्र भवनात झाली. यावेळी आमदार कार्लुस आल्मेदा तसेच नगरसेवक व शासकीय अधिकारी उपस्थित होते.
बायणातील चौपदरी महामार्ग प्रकल्य स्व. मनोहर पर्रीकर यांचा स्वप्नवत प्रकल्प होता. तो पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री सावंत प्रयत्न करीत असल्याबद्दल आमदार कार्लुस आल्मेदा यांनी समाधान व्यक्त केले. त्यांनी बायणाच्या विकासासाठी बायणा किनाऱयाला ब्ल्यू फ्लॅग मनांकन देण्याची मागणी केली. वास्कोतील कदंब स्थानक आता तीन टप्प्यात पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आलेला असून येत्या सप्टेंबरमध्ये पहिल्या टप्प्यातील कामासाठी निविदा निघणार आहेत. डेपो, प्रशासकीय इमारत व बस स्थानक अशा तीन टप्प्यात हे काम होणार असल्याची माहिती आमदार कार्लुस आल्मेदा यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी काही प्रकल्पांच्या ठिकाणी भेट देऊन पाहणीही केली. मुख्यमंत्री संध्याकाळी उशिरापर्यंत वास्कोत होते.