दोन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल
प्रतिनिधी/ कुडाळ
जावळी तालुक्यातील नववीत शिकत असणारी अल्पवयीन 14 वर्षाच्या मुलीला चाकूचा धाक दाखवत तिच्यावर वारंवार बलात्कार केला. याप्रकरणी पीडित मुलीच्याच वर्गात शिकत असणाऱया दोन अल्पवयीन मुलांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 14 वर्षाची मुलगी सात महिन्यांची गर्भवती असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. यासंदर्भात मेढा पोलीस स्थानकात 14 वर्षाच्या पीडित अल्पवयीन मुलीने फिर्याद दाखल केली असून दोन अल्पवयीन मुलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना सातारा येथील बालसुधारगृहात दाखल करण्यात आले आहे.
यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जावळी तालुक्यातील 14 वर्षाची एक अल्पवयीन मुलगी शेतात तिच्या कुटुंबीयांसह राहत होती. तिच्याच वर्गातील असणारे दोन मुले शेतातच या अल्पवयीन मुलीच्या घरी आले. घरात कोणी नसताना पाहून चाकूचा धाक दाखवत तिच्यावर दोघांनी आळीपाळीने बलात्कार केला व याचे मोबाईलवर चित्रीकरण देखील करण्यात आले. मोबाईलवर केलेला चित्रीकरणाच्या आधारे व शेतातल्या घरात कोणीही नसताना याचा कायमस्वरूपी फायदा घेत एक महिना सातत्याने दोन्ही अल्पवयीन मुलांनी वारंवार बलात्कार केला असल्याची तक्रार देखील अल्पवयीन मुलीने आपल्या फिर्यादीत दिली आहे.
यामुळे भितीच्या छायेखाली असल्याने प्रकरण थोडे वाढले व याबाबत तिच्या पोटात दुखू लागल्याने कुटुंबियांनी तिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिच्या पोटात सात महिन्याचा गर्भ असल्याची खळबळजनक माहिती समोर आली.
याबाबत संबंधित अल्पवयीन मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर फिर्यादी व कुटुंबियांनी पोलिसांना ही बाब निदर्शनास आणली. त्यानंतर तिच्याच वर्गात शिकत असणाऱया दोन मुलांच्या विरोधात सर्व हकिकत पीडित मुलीने सांगितल्यानंतर पोलिसांनी याबाबत चौकशी केल्यावर संबंधित दोन अल्पवयीन मुले दोषी आढळले. त्यांना तत्काळ ताब्यात घेऊन सातारा येथील बालसुधारगृह येथे दाखल करण्यात आले आहे. यासंदर्भात मेढा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने, इमरान मेटकरी, पद्मश्री घोरपडे, रफिक शेख करत आहेत.