वृत्तसंस्था/ नवी दिल्ली/जिनेव्हा
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (डब्लूईएफ) यांनी कोरोनाच्या नव्या विषाणू ओमिक्रॉनची चांगलीच धास्ती घेतल्याचे दिसत आहे. जगातील विविध देशात ओमिक्रॉनच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर स्वित्झर्लंडच्या दावोस येथे होणारी वार्षिक बैठक रद्द करण्यात आली आहे. डब्लूईएफ यानी दिलेल्या माहितीनुसार 17 ते 21 जानेवारी 2022 च्या दरम्यान होणारी संभाव्य दावोस बैठक आता उन्हाळय़ाच्या प्रारंभास घेण्याचा निर्णय घेतला आहे.
सलग दुसऱया वर्षी दावोस शिखर बैठकीच्या नियमित आयोजनावर अडथळा निर्माण झाला आहे. वर्ष 2021 च्या प्रारंभी ही बैठक कोविडच्या महामारीमुळे झाली नव्हती. डब्लूईएफची मागील बैठक जानेवारी 2020 मध्ये झाली होती, परंतु त्याच्या काही दिवसानंतर महामारीने थैमान घातले होते आणि जवळपास दोन वर्ष जगभरातील व्यवहार ठप्प राहिल्याचा परिणाम झाला होता. तो प्रभाव आजही असल्याचे दिसून येत आहे.
सार्वजनिक व खासगी सहयोग घडवून आणणारी आंतरराष्ट्रीय संघटना डब्लूईएफने म्हटले आहे, की महामारीच्या दरम्यान व्यक्तिगत पातळीवर भेट घेणे व बैठका घेणे अडचणीचे ठरले आहे. सध्याच्या परिस्थितीत ओमिक्रॉनचे आव्हान साऱया जगालाच झेलावे लागते आहे. तेव्हा प्राप्त परिस्थितीत ही बैठक रद्द करण्याचा सल्लाही दिला आहे. दावोस बैठकीमध्ये भारतामधील जवळपास 100 नेत्यांसह उद्योगपतींचा समावेश राहणार असल्याचा अंदाज होता.