अनेक स्पर्धा रद्द झाल्याने अडचणीत असणाऱया ऍथलीट्सना आर्थिक मदत करणार
वृत्तसंस्था/ लॉसेन
वर्ल्ड ऍथलेटिक्स आणि आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक्स फेडरेशन (आयएएफ) यांनी एकत्र येऊन आर्थिकदृष्टय़ा अडचणीत असलेल्या ऍथलीट्सच्या मदतीसाठी 5 लाख डॉलर्सचा निधी उभा केला आहे. कोरोना व्हायरसच्या साथीमुळे जगभरातील सर्वच क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत किंवा लांबणीवर टाकण्यात आलेल्या आहेत. यामुळे खेळाडूंच्या अर्थार्जनावर परिणाम झाला असून त्यांच्या मदतीसाठी हा निधी उभा केला असल्याचे विश्व ऍथलेटिक्सने मंगळवारी सांगितले.
अनेक स्पर्धा रद्द झाल्याने क्रीडापटूंचे बरेच आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे अनेक खेळाडूंनी साहय़ करण्याची मागणी करणारे अर्ज विश्व संघटनेकडे पाठविले आहेत. त्याचा आढावा सेबॅस्टियन को यांच्या नेतृत्वाखालील एक पॅनेल घेणार आहे. या आठवडय़ात या समितीची बैठक होणार असून आर्थिक निधी आणखी वाढविण्यासंदर्भातही त्यात चर्चा केली जाणार आहे.
‘जगभरातील अनेक क्रीडापटूंच्या मी सतत संपर्कात असून गेल्या दोन महिन्यांत अनेक स्पर्धा रद्द झाल्यामुळे त्यांना आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागत असल्याचे त्यांच्याशी झालेल्या चर्चेतून जाणवले,’ असे को यांनी निवेदनाद्वारे सांगितले.
‘आपल्या व्यावसायिक ऍथलीट्सचे स्पर्धेत मिळणारे बक्षीस हेच उत्पन्नाचे साधन असल्याने त्यावरच ते अवलंबून आहेत. मात्र या मोसमातील ट्रक व रोडवरील स्पर्धांवर कोरोना व्हायरस प्रकोपामुळे मोठा परिणाम झाल्याची आम्हालाही जाणीव आहे. या वर्षाच्या उत्तरार्धात तरी काही स्पर्धा आम्ही आयोजित करू शकू, अशी मला आशा वाटते. दरम्यानच्या काळात या निधीच्या माध्यमातून जास्तीत जास्त खेळाडूंना मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. तसेच जादाचा निधी संकलित करण्याचाही आम्ही प्रयत्न करणार आहोत,’ असे को यांनी सांगितले.
डायमंड लीग ही ट्रक अँड फील्डमधील सर्वात मोठी स्पर्धा असून एप्रिल ते जून या कालावधीत सात विविध शहरात होणाऱया या लीगमधील स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. लंडनमध्ये 4 जुलै रोजी आणि त्यानंतर मोनॅकोमध्ये 10 जुलै रोजी या लीगमधील उर्वरित दोन टप्पे नियोजित आहेत. हे दोन टप्पे तरी कोणताही अडथळा न येता निश्चितपणे पार पडतील, अशी आशा केली जात आहे.