वृत्तसंस्था /नवी दिल्ली
स्पेनमधील हुएल्वा येथे येत्या रविवारपासून सुरू होणाऱया बीडब्ल्यूएफ बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपमधून जपानच्या विद्यमान विजेत्या केन्टो मोमोटाने माघार घेतली आहे. पाठदुखीतून पूर्ण सावरला नसल्याने त्याने हा निर्णय घेतला असल्याची माहिती बीडब्ल्यूएफने दिली आहे.
मोमोटाने गेल्या आठवडय़ात बाली येथे झालेल्या वर्ल्ड टूर फायनल्समधूनही स्पर्धा अर्धवट सोडून माघार घेतली होती, असे त्यांनी सांगितले. वर्ल्ड टूर फायनल्सच्या गट अ मधील भारताच्या लक्ष्य सेनविरुद्धच्या सामन्यात दोन गेम झाल्यानंतर माघारीचा निर्णय घेतला होता. ट्रेनिंगच्या वेळी त्याला दुखापत झाली होती. वर्ल्ड चॅम्पियनशिपमधून माघार घ्यावी लागत असल्याने त्याने दिलगिरी व्यक्त केली असल्याचेही बीडब्ल्यूएफने सांगितले.
कोविड महामारीच्या मोठय़ा ब्रेकनंतर बॅडमिंटन स्पर्धांना पुन्हा सुरुवात झाली होती. मोमोटाने एकूण 6 स्पर्धांत भाग घेतला होता. पण प्रेंच ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत त्याने आपल्याच देशाच्या कांता त्सुनेयामाविरुद्ध माघार घेतली होती. इंडोनेशिया ओपनच्या उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर, आपल्याला खूप थकवा जाणवत असल्याची तक्रार त्याने केली होती.
मलेशियाची सातवी मानांकित चॅन पेंग सून व गोह लियू यिंग या दुहेरीच्या जोडीने 13 वर्षे एकत्र खेळल्यानंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला असल्याने वर्ल्ड चॅम्पियनशिपमधून त्यांनीही माघार घेतली आहे. रविवारपासून सुरू होणाऱया स्पर्धेसाठी अनेक खेळाडू स्पेनमध्ये पोहोचले असून ते बायोबबलमध्ये राहत असल्याचे आयोजकांनी सांगितले. माघारीमुळे नवा ड्रॉ काढणार नसल्याचेही विश्व संघटनेने स्पष्ट केले.