न्यूयॉर्क : 100 मीटर्सचा वर्ल्ड चॅम्पियन ख्रिस्तियन कोलमन याच्यावर दोन वर्षांची बंदी घातल्याने पुढील वर्षीची टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा त्याला हुकणार असल्याचे ऍथलेटिक्स इंटेग्रिटी युनिटने (एआययू) जाहीर केले. स्पर्धा नसलेल्या कालावधीत आपला ठावठिकाणा सांगण्याचा नियम बनविण्यात आला आहे. कोलमनने या नियमाचा भंग केल्याने त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
गेल्या वर्षी कोलमनने तीन वेळा डोपिंग चाचण्या टाळल्या होत्या, पण त्यावेळी बंदीच्या कारवाईतून त्याची थोडक्यात सुटका झाली होती. गेल्या जूनमध्ये एआययूने त्याच्यावर तात्पुरत्या निलंबनाची कारवाई केली होती. 9 डिसेंबर 2019 रोजी आपण घरीच राहणार असल्याचे त्याने कळविले होते. प्रत्यक्षात मात्र तो नाताळ सणाच्या खरेदीसाठी बाहेर पडला होता.
डोपिंगविरोधी पदाधिकाऱयांनी त्यावेळी नियमानुसार प्रक्रिया राबविली नव्हती, असा उलटा दावा कोलमनने केला होता. डोपिंग नियंत्रण अधिकाऱयांची शिस्तपालन समितीसमोर सुनावणी झाली त्यावेळी त्यांनी कोलमनच्या घरावर 9 डिसेंबर रोजी दिलेल्या वेळेत (संध्याकाळी 7.15 ते 8.15) नजर ठेवल्याचे स्पष्ट केले. कोलमनने मात्र एक तासाची वेळ संपण्याआधीच घरी पोहोचल्याचे सुनावणीत सांगितले होते. पण त्याने खरेदी केलेल्या दुकानाच्या पावतीवर रात्री 8.22 ची वेळ नोंद असल्याने त्याचे पितळ उघडे पडले. त्यामुळे त्याची साक्ष ग्राहय़ न मानता त्याच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला गेला. त्याच्या बंदीचा कालावधी 13 मे 2022 रोजी संपणार आहे. क्रीडा लवादासमोर या निकालाविरुद्ध त्याला दाद मागता येणार आहे.