वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दोन ऑलिम्पिक पदके मिळविणाऱया पीव्ही सिंधूने वर्षअखेरीस होणाऱया बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायनल्समधून माघार घेतली आहे. डाव्या पायाच्या घोटय़ाला झालेल्या स्ट्रेस प्रॅक्चरमधून ती अद्याप पूर्णपणे बरी झाली नसल्याने तिने हा निर्णय घेतला.
2018 मध्ये झालेल्या वर्ल्ड टूर फायनल्समध्ये सिंधूने जेतेपद पटकावले होते. गेल्या ऑगस्टमध्ये झालेल्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत तिने सुवर्णपदक पटकावले, त्यावेळीच तिला ही दुखापत झाली होती. वर्ल्ड टूर फायनल्स स्पर्धा चीनमधील गुंआंगझू येथे 14 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. ‘नवा मोसम सुरू होण्याआधी ती पूर्णपणे तंदुरुस्त व्हावी, यासाठी तिच्या डॉक्टर्सनी तिला जादा वेळ विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. तिने होणाऱया परिणामांचा विचारही केला. पण गुंआंगझूमध्ये बरेच निर्बंध असल्याने तसेच नवा मोसम लक्षात घेत तिने या स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला,’ असे सिंधूचे वडील पीव्ही रमना यांनी सांगितले. गुआंगझूमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने तेथे कडक निर्बंध घालण्यात आले आहेत.