91 कोटी लाभार्थींना पहिला डोस देत गाठली मोठी मजल
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
मागील वर्षी 16 जानेवारी 2021 रोजी सुरू झालेल्या कोरोना प्रतिबंधक देशव्यापी मोहिमेला रविवारी एक वर्ष पूर्ण झाले. 138 ते 140 कोटीच्या आसपास लोकसंख्या असलेल्या देशात वर्षभरात जवळपास 157 कोटी डोस देण्यात आले. शनिवारपर्यंत देशात एकूण 156 कोटी 68 लाख 14 हजार 804 कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आले होते. रविवारी हा आकडा 157 कोटींच्या पुढे पोहोचला आहे. सरकारने 18 वर्षांवरील वयोगटातील 95 कोटी लोकसंख्येला लसीचा डोस देण्याचे उद्दिष्ट निश्चित केले होते. मात्र, आतापर्यंत एकूण 91 कोटी लोकांना पहिला डोस देत वर्षभरात मोठी मजल गाठल्याचे दिसून येत आहे.
देशात कोरोनाची तिसरी लाट आलेली असताना लसीकरण महत्त्वाची भूमिका पार पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. येत्या काळात बूस्टर डोसचे आव्हान प्रशासनापुढे आहे. लसीकरणाच्या वर्षपूर्तीनिमित्त रविवारी विशेष टपाल तिकीट जारी करण्यात आले. यशस्वी होत असलेल्या या लसीकरण मोहिमेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी विशेष कौतुक केले आहे.
देशात मागील महिन्यातच 15 ते 18 वर्ष वयोगटातील जवळपास 8 कोटी मुलांना लस देणे आवश्यक आहे. काही दिवसांपूर्वीच देशात या वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. आतापर्यंत 3 कोटी 36 लाखांहून अधिक मुलांना लस देण्यात आली आहे. म्हणजेच, जवळपास 40 टक्के मुलांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. अद्याप या मुलांना लसीचा दुसरा डोस मिळणे बाकी आहे. तसेच गेल्या सोमवारपासून कोरोनायोद्धे आणि 60 वर्षांवरील व्याधीग्रस्त असलेल्या ज्येष्ठांना बूस्टर डोस सुरू करण्यात आला आहे.
लसीकरणामुळे वाढली संसर्गाशी लढण्याची शक्ती ः पंतप्रधान
भारताच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांचे कौतुक केले. लसीकरण मोहिमेमुळे कोरोनाविरुद्धच्या लढाईत देशाची ताकद वाढली आहे. लसीकरण मोहिमेमुळे जीव वाचविण्यात आणि उपजीविकेचे रक्षण करण्यात मदत झाली आहे. आज आम्ही लस मोहिमेला एक वर्ष पूर्ण केले आहे. लसीकरण मोहिमेत सहभागी असलेल्या सर्वांना मी सलाम करतो. आमच्या लसीकरण कार्यक्रमाने कोरोनाविरुद्धच्या लढाईत खूप बळ दिले आहे, असे ट्विट पंतप्रधानांनी केले आहे.
भारताची मोहीम जगातील सर्वात यशस्वी ः मनसुख मांडविया
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी देशातील कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम जगातील सर्वात यशस्वी असल्याचे म्हटले आहे. ‘आज जगातील सर्वात मोठय़ा लसीकरण मोहिमेला एक वर्ष पूर्ण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली ही मोहीम आज सर्वांच्या प्रयत्नांमुळे जगात सर्वात यशस्वी ठरली आहे. मी सर्व आरोग्य कर्मचारी, वैज्ञानिक आणि देशवासियांचे अभिनंदन करतो. देशवासियांच्या एकजुटीमुळे आणि पंतप्रधान मोदींच्या वचनबद्धतेमुळे आज देशाने मोठी लसक्रांती केली आहे, असे ते म्हणाले.