ऑनलाईन टीम/तरुण भारत
दोन वर्ष कोरोनामुळे आर्थिक फटका सहन अर्थव्यवस्था पुन्हा पूर्वपदावर आणण्याचं मोठं आव्हान या वर्षी देशासमोर असणार आहे. या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलेल्या इतर अनेक घोषणांसोबत देशात पायाभूत सुविधांमध्ये मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. देशात महामार्गांचे जाळे विस्तारणार असून तब्बल २५ हजार किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग उभे करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी आज केली आहे.
देशाच्या अर्थव्यवस्थेला चालणा देण्यासाठी अर्थमंत्र्यांनी पंतप्रधान गतीशक्ती योजनेची घोषणा केली आहे. या अंतर्गत देशातील राष्ट्रीय महामार्गांचं जाळं २५ हजार किलोमीटरने वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे. पुढील वर्षभरात अर्थात २०२२-२३ साठी हे लक्ष्य निश्चित करण्यात आलं आहे.
तसेच मेट्रो ट्रेनचं जाळं उभं करण्यासाठी प्रोत्साहन देणार असल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे. तसंच पुढच्या तीन वर्षात ४०० वंदे भारत रेल्वे सुरु करून रेल्वेचं जाळं विकसित करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, देशातील डोंगराळ भागात रस्त्यांचं जाळं विस्तारण्यासाठी निर्मला सीतारमण यांनी ‘पर्वतमाला’ या योजनेची घोषणा केली आहे. याअंतर्गत दुर्गम आणि डोंगराळ भागामध्ये रस्ते बांधण्याचे उपक्रम हाती घेतले जाणार आहेत