नैर्त्रुत्य रेल्वेने सुरू केली तयारी, म्हैसूर-बेळगाव रेल्वेचाही समावेश
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनामुळे वर्षभरापासून बंद असणारी पॅसेंजर रेल्वे पुन्हा रुळावर येणार आहे. रेल्वे बोर्डकडून काही पॅसेंजर सुरू करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. त्यामध्ये हुबळी-मिरज-हुबळी व बेळगाव-मिरज-बेळगाव या दोन पॅसेंजरचा समावेश करण्यात आला आहे. या पॅसेंजर लवकरच धावणार आहेत. यामुळे हुबळी ते मिरज या दरम्यान प्रवास करणाऱया प्रवाशांची सोय होणार आहे.
केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी देशातील 80 टक्के रेल्वे पूर्ववत सुरू होणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर लगेचच बेळगाव परिसरातून धावणाऱया 2 पॅसेंजर रेल्वेंना परवानगी मिळाली आहे. मार्च 2020 पासून पॅसेंजर बंद होत्या. यामुळे प्रवाशांचे हाल होत होते. ऍडव्हान्स बुकिंग करून प्रवास करण्याची वेळ जिल्हय़ातील प्रवाशांना येत होती. लोंढा, रायबाग, कुडची, घटप्रभा, गोकाक याठिकाणी येणाऱया व जाणाऱया प्रवाशांची गैरसोय होत असल्याची पॅसेंजर सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती. अखेर ही मागणी रेल्वे विभागाने मान्य केली आहे.
अजून तारखेबाबत अनिश्चिती
नैर्त्रुत्य रेल्वेने गुरुवारी एक पत्र हुबळी, बेंगळूर व म्हैसूर या तिनही विभागांना पाठवून पॅसेंजर तसेच इतर रेल्वे सुरू करण्याबद्दल वेळापत्रकाचे नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत. नैर्त्रुत्य रेल्वेकडून 13 रेल्वे सुरू केल्या जाणार आहेत. त्यापैकी बेळगाववरून धावणाऱया 2 पॅसेंजर व 1 एक्स्प्रेसचा समावेश करण्यात आला आहे. नियोजन पूर्ण होताच काही दिवसात पॅसेंजर रेल्वे धावणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
म्हैसूर-बेळगाव विश्वमानव एक्स्प्रेसही धावणार
मागील वर्षभरापासून कोरोनामुळे बंद असलेली म्हैसूर-बेळगाव विश्वमानव एक्स्प्रेसही लवकरच धावणार आहे. रेल्वे बोर्डकडून या रेल्वेला परवानगी मिळाली असून त्याबाबतचे नियोजन करण्याचे आदेश नैर्त्रुत्य रेल्वेच्या विभागीय कार्यालयांना देण्यात आले आहेत. त्यामुळे बेळगावमधून प्रवास करणाऱया प्रवाशांसाठी आणखी एका रेल्वेची भर पडली आहे. या रेल्वेमुळे म्हैसूरला जाणाऱया प्रवाशांची सोय होणार आहे.