नवी दिल्ली / वृत्तसंस्था
21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून प्रत्येक वर्षी साजरा करण्यात येतो. या प्रथेचा प्रारंभ 2015 पासून झाला आहे. याच दिवसाची निवड जागतिक योगदिन म्हणून का करण्यात आली, याचे कारण या दिवसाच्या वैशिष्टय़ात दडलेले आहे. हा दिवस वर्षातला सर्वात मोठा दिवस असतो.
जगात उन्हाळा आणि हिवाळा असे दोनच 6-6 महिन्यांचे ऋतू मानले जातात. पावसाळा हा काही देशांमध्ये उन्हाळय़ात तर काही देशांमध्ये हिवाळय़ात येतो. त्यामुळे तो तांत्रिकदृष्टय़ा स्वतंत्र ऋतू मानण्यात येत नाही. उन्हाळय़ात दिवस मोठा तर रात्र लहान असते. त्यामुळे 21 जून हा उन्हाळय़ात येणारा दिवस सर्वात मोठा असतो. भारतात हा दिवस मान्सूनच्या पावसाळय़ात येत असल्याने तो पावसाळी दिवस मानला गेल्या तरी प्रत्यक्षात तो उन्हाळय़ातील दिवसच असतो.
या दिवशी पृथ्वीचा अक्ष उत्तर गोलार्धात सूर्याच्या सर्वात जास्त जवळ कललेला असतो, हे या दिवसाचे आणखी एक वैशिष्टय़ आहे. या दिवशी उत्तर गोलार्धात दिवस 13 तास 58 मिनिटांचा तर रात्र 10 तास 2 मिनिटांची असते. वर्षातील इतर कोणत्याही दिवशी दिवस इतका मोठा आणि रात्र इतकी लहान असत नाही.
या दिवसानंतर हळूहळू रात्र मोठी आणि दिवस लहान लहान होत जातो. हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे मकर संक्रांतीदिवशी प्रारंभ झालेले ‘उत्तरायण’ साधारणतः जून 14 ते 20 जून या कालावधीत, अर्थात 21 जूनच्या आसपासच संपते. ही सर्व वैशिष्टय़े लक्षात घेऊन जागतिक योगदिनाचा प्रारंभ याच दिवशी करण्यात आला.