सेन्सेक्स 459 अंकांची तेजी : मारुती, एसबीआय मजबूत
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात वर्ष 2021 च्या अंतिम दिवशी आठवडय़ाच्या अंतिम सत्रात शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स 459 अंकांची तेजी प्राप्त करत बंद झाला आहे. दिग्गज कंपन्यांमध्ये मारुती सुझुकी, भारतीय स्टेट बँक आणि बजाज फायनान्स यांचे समभाग वधारत बंद झाला आहे.
प्रमुख समभागाच्या मदतीने सेन्सेक्स 459.50 अंकांनी वधारुन निर्देशांक 58,253.82 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 150.10 अंकांनी वधारुन निर्देशांक 17,354.05 वर बंद झाला आहे.
प्रमुख कंपन्यांमध्ये टायटनचे समभाग 3.5 टक्क्यांनी मजबूत होत बंद झाले असून अन्य कंपन्यांमध्ये कोटक बँक, स्टेट बँक, मारुती सुझुकी, बजाज फायनान्स, हिंदुस्थान युनि, ऍक्सिस बँक आणि सन फार्मा यांचे समभाग लाभासह बंद झाले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये एनटीपीसी, टेक महिंद्रा, पॉवरग्रिड कॉर्प आणि इन्फोसिस यांचा समावेश घसरणीत राहिला आहे.
जागतिक बाजारात हाँगकाँगचा हँगसेंग 1.24 टक्क्यांनी तर चीनचा शांघाय कम्पोजिट निर्देशांक 0.57 टक्क्यांनी लाभात राहिले असून जपान आणि दक्षिण कोरियामधील शेअर बाजार बंद राहिल्याची माहिती आहे. दुसरीकडे युरोपमधील प्रमुख बाजार दुपारपर्यंत घसरणीसह बंद झाले आहेत.
बाजारामील मागील वर्षातील मुद्दे
वर्ष 2021 चा प्रारंभ हा जगभरात कोरोना महामारीतून सावरत असतानाच मार्च महिन्यात पुन्हा एकदा दुसऱया लाटेचे थैमान घातले होते. परंतु त्यानंतर मात्र बाजार सावरत नव्या प्रवासकडे वळल्याचे पहावयास मिळाले आहे. साधारणपणे निफ्टीने ऑक्टोबरपर्यंत मजबूत स्थिती प्राप्त केली होती, त्यानंतर मात्र त्यामध्ये काहीशी सुधारणात्मक स्थिती राहिली होती. जागतिक पातळीवर आणि भारतामध्ये जीडीपीची स्थिती सकारात्मक राहण्यासोबत बाजारातील भांडवल उच्चांकी पातळीवर राहिली होती. याचे कारण म्हणजे मोठय़ा प्रमाणात झालेली अर्थव्यवस्थेमधील उलाढाल , कमी व्याजदर, लवकरात लवकर करण्यात आलेले लॉकडाऊनमधील शिथिलीकरणाचा निर्णय याचाही प्रभाव भारतीय बाजारावर राहिल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे. यासोबतच गुंतवणूकदारांना अन्य पर्यायांच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध झाली असल्याचे पहावयास मिळाले आहे.