जखमींवर बेल एअर रुग्णालयात उपचार
वार्ताहर/ कुडाळ
पांचगणी- महाबळेश्वर रोडवर कोंबडा बिडीजवळ एका वऱहाडच्या ट्रकचा अपघात झाला असून यामध्ये 23 जण जखमी झाले आहेत. जखमींना बेल एअर रुग्णालयात दाखल केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मांढरदेव वाई येथून ट्रक क्रमांक mh 43 u 7860 ही गाडी घोटेघर येथील लग्नासाठी आली होती. हा ट्रक पसरणी घाट चढून पांचगणी येथे आला. या ठिकाणी आल्यावर कोंबडा बिडीजवळ ऐका वळणावर रस्त्याचा अंदाज न आल्याने झालेल्या अपघातात ट्रक पूर्णपणे पलटी झाला.
यामध्ये वऱहाडाचा जोरदार गलका झाला. आरडाओरडा ऐकायला आला. गाडीतील सर्व जखमींना लागलीच नगरपालिका रुग्णवाहिका, एसओएस ग्रुपच्या सदस्यांनी रुग्णवाहिका घेऊन रुग्णांना बेल एअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
यावेळी घटनास्थळी पोलीस दाखल झाले. अपघातात 12 पुरुष 5 महिला व दोन मुले गंभीर जखमी झाले असल्याची माहिती सपोनी राजेश माने यांनी दिली.