प्रतिनिधी / सांगली
सांगलीतील सहकार क्षेत्रामध्ये एकेकाळी नावाजलेल्या वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेच्या मुख्य इमारतीच्या लिलावास स्थगिती देण्यात आली आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी महापौर सुरेश पाटील यांनी गुरुवारी सांगलीत पत्रकार बैठकीत दिली.
बँकेचे 364 कोटी रुपयाची येणे असून केवळ 156 कोटी रुपये देणे आहेत त्यामुळे कर्ज वसुली केली तर बँक पुन्हा उभा राहू शकते. यासाठी राज्य सहकारी बँकेचे 5 सक्षम अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. कर्ज वसुली करण्यापेक्षा बँकेच्या मालमत्तेचा कमी रकमेला लिलाव करण्याकडे काही काहींचा डाव आहे.
दरम्यान, याबाबत मुंबईत नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीला राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सहकार आयुक्त एस के सोनी, राज्य सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक अजित देशमुख आदी उपस्थित होते.
या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार बँकेच्या मालमत्ता विक्री करण्यास स्थगिती देण्यात आली. याप्रश्नी सुरेश पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे.