ऑनलाईन टीम / वसई
पालघर जिल्ह्यातील वसई पूर्वेच्या पोमण जवळील साष्टीकरपाडा येथे गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास परफ्यूम तयार करण्याच्या कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली असून, या आगीत नेमकी कीती नुकसान झाले ही माहिती मिळू शकली नसली तरी मोठ्या प्रमाणात वित्त हाणी झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. आगीचे लोळ उठू लागताच अग्निशमन दलाकडून याची दखल घेत आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते.
पूर्वे वसई परीसरातील पोमण ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या साष्टीकरपाडा परिसरात परफ्यूम तयार करण्याचा कारखाना आहे. या कारखान्याला गुरुवारी सकाळच्या सुमारास अचानकपणे आग लागली. याची माहिती स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलाला दिली. ही माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. यावेळी आगीवर नियंत्रण मिळवताना आगीच्या भक्ष्य स्थानी वेगवेगळ्या प्रकारची सुंगधी द्रव्ये असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यास अडथळे येत होते. कारण सुंगधी द्रव्यामुळे आगीची तीव्रता अधिक वाढत होती. मात्र आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.